Rain Alert ! पुढील ४८ तासांत गुजरातसह महाराष्ट्रात सर्वत्र वादळी पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:55 IST2020-10-17T18:30:02+5:302020-10-17T18:55:23+5:30
१८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता....

Rain Alert ! पुढील ४८ तासांत गुजरातसह महाराष्ट्रात सर्वत्र वादळी पावसाची शक्यता
पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्राला मिळाल्यानंतर आता आता अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पुढील ४८ तासांत ओमानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. यामुळे गुजरातसह महाराष्ट्रात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन अरबी समुद्रात जाताना नुकत्याच आलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला आहे. शनिवारी सकाळी अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ते शनिवारी सकाळी गुजरातच्या वेरावळपासून ३८० किमी, मुंबईपासून ४४० किमी तसेच ओमानपासून १६०० किमी दूर आहे. येत्या ४८ तासात ते आणखी सक्रिय होऊन पश्चिमेकडे ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील २४ तास सौराष्ट्र, कच्छच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून येत्या २४ तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडला. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.
१८ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. १९ ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
२० ऑक्टोबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
़़़़़़़़़
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
कोकणातील बहुतांश जिल्ह्यात १९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात १९ व २० ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.