लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी देतानाच भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देत माजी आमदार रामराव वडकुते (हिंगोली) व नागपूरच्या माजी महापौर माया इवनाते यांनाही राज्यसभेची संधी दिली आहे.
तावडे यांना संघटनात्मक जबाबदारीतून संसदीय राजकारणात आणले जाईल, अशी अटकळ होतीच. ते पहिल्यांदाच राज्यसभेवर जाणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्यात मंत्री, पक्षाचे राष्ट्रीय सचिव, नंतर सरचिटणीस आणि आता राज्यसभा सदस्य असा त्यांचा प्रवास. नजीकच्या भविष्यात त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळेल, असेही म्हटले जाते. एनडीएचा घटकपक्ष असलेल्या रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना यावेळी खासदारकी दिली जाणार नाही असे तर्क दिले जात असतानाच भाजपने त्यांना पुन्हा संधी दिली. राज्यसभेच्या खासदारकीची हॅट्ट्रिक आठवले पूर्ण करतील. ते लोकसभा सदस्यही राहिले आहेत.
कोअर कमिटीचीच नावेसूत्रांनी सांगितले की भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीने चार जागांसाठी २५ नावे केंद्रीय भाजपकडे पाठविली होती. आज जाहीर झालेल्या चौघांचीही नावे त्या २५ मध्ये होती. बाहेरील राज्यातून एखाद्या नेत्याला महाराष्ट्रात संधी दिली जाईल, असे म्हटले जात होते; पण तसे झाले नाही. या २५ नावांमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कराड, डॉ. भारती पवार, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, धैर्यशील पाटील, माधव भंडारी, प्रीतम मुंडे आदींचाही समावेश होता; पण त्यांना केंद्रीय नेतृत्वाने संधी दिली नाही.
सामाजिक समीकरण साधलेविनोद तावडे (मराठा), रामदास आठवले (अनुसूचित जाती), रामराव वडकुते (धनगर-ओबीसी) आणि माया इवनाते (आदिवासी) असे जातीय संतुलन भाजपने उमेदवारी देताना साधले. याशिवाय विनोद तावडे, रामदास आठवले (मुंबई), वडकुतेंच्या रूपाने मराठवाड्याला, तर इवनातेंच्या रूपाने विदर्भाला संधी दिली.
वडकुतेंना सरप्राइज गिफ्टरामराव वडकुते हे राजकारणात मागे पडले असे गृहीत धरले जात असतानाच त्यांना एकदम राज्यसभेत पाठवून भाजप नेतृत्वाने त्यांना सरप्राइज गिफ्ट दिले. राष्ट्रवादीकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा ११ महिन्यांचा कार्यकाळ बाकी असताना २०१९ मध्ये वडकुते यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपकडे त्यांनी कळमनुरीतून उमेदवारी मागितली; पण ती मिळाली नव्हती. राष्ट्रवादीत असताना ते शेळी-मेंढी महामंडळाचे अध्यक्ष होते. ते भाजपचे जिल्हाध्यक्षही होते.
दोन विद्यमान खासदारांना पुन्हा संधी नाहीमाजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि रायगड जिल्ह्यातील नेते धैर्यशील पाटील या दोन विद्यमान खासदारांना भाजपने पुन्हा संधी दिली नाही. धैर्यशील पाटील हे पूर्वी शेकापमध्ये होते. ते भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांना दीड वर्षांसाठीच खासदारकी मिळाली. उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांना संधी देण्यात आली होती. गेल्या वेळी आठवले यांच्यासह कराड व पाटील हे तिघे खासदार होते.
माया इवनाते यांचा विलक्षण प्रवासअत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या माया इवनाते या भाजपच्या धडाडीच्या व निष्ठावंत कार्यकर्त्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या निकटवर्ती आहेत. त्यांचे पती दिवंगत चिंतामण इवनाते हेही फडणवीस यांच्या जवळचे होते. फडणवीस यांच्या आधीच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातील ते प्रमुख कार्यकर्ते होते. पक्षकार्यासाठी सातत्याने राबणाऱ्या मायाताईंना आज राज्यसभेची उमेदवारी मिळाली. त्या नागपूरच्या महापौर तर होत्याच, अलीकडे नागपूर महापालिकेत पुन्हा एकदा निवडून गेल्या आहेत.
संगीता फुसाटेंची संधी पुन्हा हुकलीपुसदच्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष डॉ. संगीता फुसाटे यांचे नावही केंद्रीय भाजपकडे पाठविले होते; पण त्यांच्याऐवजी अनुसूचित जमातीच्याच असलेल्या माया इवनाते यांना संधी मिळाली. मागे विधान परिषदेसाठी फुसाटे यांचे नाव नक्की झाले असताना आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांना संधी दिली होती.
Web Summary : BJP nominated Vinod Tawde, Ramdas Athawale, Ramrao Wadkute, and Maya Ivnate for Rajya Sabha, surprising many. The party balanced caste and regional representation, rewarding loyalists and offering a surprise to Wadkute.
Web Summary : भाजपा ने विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते और माया इवनाते को राज्यसभा के लिए नामांकित किया, जिससे कई लोग हैरान रह गए। पार्टी ने वफादारों को पुरस्कृत करते हुए जाति और क्षेत्रीय प्रतिनिधित्व को संतुलित किया।