Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:12 IST2025-07-05T15:10:10+5:302025-07-05T15:12:15+5:30
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर; कोण कुठल्या शाळेत शिकले याची यादीच वाचून दाखवली...

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील दोन बडे नेते आणि चुलत भाऊ तब्बल २० वर्षांनंतर एकत्र आले. वरळीच्या विजयी मेळाव्यात मराठी मुद्द्यावरून राज आणि उद्धव यांनी एकत्रित आपले विचार मांडले. मराठी भाषेची सक्ती असायलाच हवी पण हिंदीची सक्ती कराल तर मराठी माणूस पेटून उठेल आणि तुम्हाला पळवून लावेल, असा संदेश ठाकरे बंधूंनी दिला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ठाकरेंची मुले इंग्रजी माध्यमातून शिकली या सत्ताधाऱ्यांच्या आरोपाला राज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच, कोण कुठल्या शाळेत शिकले याची यादीच वाचून दाखवली.
"बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मिडियममध्ये शिकले. लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूल मध्ये शिकले... हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? अडवाणी हे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत. दक्षिण भारतात तमिळ किंवा तेलगू च्या प्रश्नावर लोक कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. त्यांना कोणीही विचारत नाही की तुम्ही कुठे शिकलात किंवा तुमची मुले कुठे शिकली. मी हिब्रू भाषेत शिकेन पण मराठी भाषेच्या कडवटपणा बाळगेन, त्याला काय तक्रार असू शकते?" असा रोखठोक सवाल राज ठाकरेंनी विचारला.
त्यानंतर राज यांनी थेट यादीच वाचून दाखवली. "दक्षिण भारतातील इंग्रजीतून शिकलेले नेते आणि अभिनेते यांची यादी पाहा. जय ललिता दोमेंदो इंग्रजी मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्वेंट स्कूल, करूणानिधींचा नातू उदयनिधी डॉन बॉस्को, चंद्राबाबू नायडू इंग्रजीचे शिक्षक होते व शिक्षणही त्याच मिडियममधून झाले. पवन कल्याण शिक्षण सेंट अँनमधून झालं. चंद्रबाबूंचा मुलगा नारा लोकेश स्टँडफर्ड स्कूल, कमल हसन सँनफम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉडफर्ड स्कूल, एआर रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास ख्रिश्चनरी हायस्कूल..." असे म्हणत राज ठाकरे यांनी संपूर्ण यादी वाचून दाखवत महायुती सरकारला गप्प केलं.