राज ठाकरेंचा पुन्हा 'जय महाराष्ट्र'; भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सरकारचा 'नीट' समाचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 15:59 IST2018-07-18T15:58:48+5:302018-07-18T15:59:06+5:30
'नीट परीक्षेसाठी बाहेरून पोरं भरली, तर आमची त्यावर बारीक नजर असेल. सरकारला ही धमकी वाटत असेल तर धमकी समजा, पण नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य मिळालंच पाहिजे', असा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आपल्या 'सुपरहिट' विषयाला हात घातला.

राज ठाकरेंचा पुन्हा 'जय महाराष्ट्र'; भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सरकारचा 'नीट' समाचार!
पुणेः 'नीट परीक्षेसाठी बाहेरून पोरं भरली, तर आमची त्यावर बारीक नजर असेल. सरकारला ही धमकी वाटत असेल तर धमकी समजा, पण नीटमध्ये महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य मिळालंच पाहिजे', असा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा आपल्या 'सुपरहिट' विषयाला हात घातला.
बाहेरच्या राज्यांतील मुलांनाच नीट परीक्षेत भरती करायचं असल्याने दरवर्षी उद्भवणारा हा प्रश्न सरकार सोडवत नाहीए, असा आरोपही त्यांनी केला. अन्य राज्यांतील सरकारांनी आपापल्या राज्यांतील मुलांना प्राधान्य देण्यासाठी नीटच्या नियमांना कायद्याची चौकट दिली आहे, पण महाराष्ट्र सरकारने असं काहीही केलं नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
मराठवाडा दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी 'नीट'वरून त्यांनी सरकारचा 'नीट' समाचार घेतला. दरवर्षी नीटची समस्या उद्भवते. प्रत्येक वेळी विद्यार्थी-पालक मला भेटतात. तक्रारी मांडतात. दरवेळी आंदोलने करून, इशारे देऊन आणि सरकारशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावावा लागतो. हे किती काळ चालणार? राज्यात इतकी वैद्यकीय महाविद्यालयं असताना जर आपल्या मुलांना प्रवेश मिळत नसेल तर त्यांनी कुठे जायचं? सरकार काही करत नसल्यानेच हा प्रश्न निर्माण झालाय. त्यावर तोडगा काढायचा असेल तर सर्व नियमांना कायद्याचं कवच देण्याची गरज राज यांनी व्यक्त केली.