Raj Thackeray Facebook Post : मराठीच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात राजकारण पेटले आहे. या राजकारणाच्या दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेने उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर तब्बल २० वर्षांच्या कालावधीने राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरे यांनी आपला मराठीचा मुद्दा रोखठोकपणे मांडला. याशिवाय मिरारोड येथे मराठी भाषकांविरोधात अमराठी लोकांनी केलेल्या कुरबुरी पाहून, आज मनसेने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आणि मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवून दिली. आजच्या मोर्चानंतर काही मनसैनिकांनी भाषणे केली आणि आपली रोखठोक मते मांडली. त्यानंतर, आज राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुकवरून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रवक्ते यांच्यासाठी एक आदेश दिला आहे.
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे, त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही", असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, आज परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाविरोधात मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्याशिवाय मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेकांना नोटीस बजावल्या होत्या. १० वाजता मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागले तेव्हा पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू झाली. त्यातूनच मीरारोडमध्ये संघर्ष वाढला. या सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली. मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ११ तासांत बरेच काही घडले, असे अविनाश जाधव यांनी माहिती दिली.