'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 18:46 IST2024-08-09T18:43:47+5:302024-08-09T18:46:33+5:30
राज ठाकरे यांच्या मराठवाड्यात दौऱ्यात पुन्हा एकदा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यावेळी बीडमध्ये उद्धव ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले.

'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा
बीड - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात अनेक ठिकाणी त्यांना मराठा कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागले. त्यातच आज बीड जिल्ह्यात एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देत उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. यावेळी हे कार्यकर्ते मशाल चिन्ह असलेला झेंडाही सोबत घेऊन आले होते.
राज ठाकरे आज बीड जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. राज हे ज्या हॉटेलला थांबणार आहेत त्या दिशेने त्यांचा ताफा निघाला होता मात्र हॉटेलनजीकच उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर येण्याचा प्रयत्न केला. सुपारीबाज चले जाव अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. याचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर हे करत होते. राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, त्यामुळे विधानसभेला कुणाची सुपारी घेतली असा जाब विचारण्यासाठी आम्ही आलोय असं गणेश वरेकरांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी अडवला राज ठाकरेंचा ताफा, बीडमध्ये घडला प्रकार #RajThackeray#UddhavThackeraypic.twitter.com/esVQArF1vv
— Lokmat (@lokmat) August 9, 2024
यावेळी मराठा आरक्षणावरूनही उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज ठाकरेंनी मनोज जरांगेवर टीका केली असं कार्यकर्ते म्हणत होते. या घडलेल्या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर राज ठाकरे हे हॉटेलला पोहचले. याठिकाणी बीड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि काही समाजसेवी संघटनांतील लोकांसमोर राज ठाकरेंची बैठक होणार आहे.
ठाकरे गटाचे कार्यकर्ते-मनसैनिक आमनेसामने
बीड दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून झाला. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर ठाकरे गटाचा जिल्हाध्यक्ष हा गुटखा चोर असून त्याचा मराठा आरक्षणाशी काहीही संबंध नाही. मराठा समन्वयकांशी आमचं बोलणं झालं होतं. मात्र हा गुटखा चोर मनसे कार्यकर्ता बनून आमच्या रॅलीत आला, ते २-३ जण होते, त्यांना मनसे स्टाईलनं चोप दिला आहे. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. मात्र त्यांना कपडे फाटेपर्यंत मारलं असून इथून पुढे राज ठाकरेच नव्हे तर कुठल्याही नेत्यासमोर अशी स्टंटबाजी करणार नाही असं मनसे पदाधिकाऱ्याने सांगितले आहे.