पावसाचा फटका; डेक्कन एक्स्प्रेस रद्द, दोन ट्रेनचे मार्ग बदलले !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 03:03 IST2018-07-07T17:30:45+5:302018-07-08T03:03:02+5:30
मुंबईसह राज्यभरात कोसळणा-या पावसानं रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणा-या अनेक एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत.

पावसाचा फटका; डेक्कन एक्स्प्रेस रद्द, दोन ट्रेनचे मार्ग बदलले !
मुंबई- मुंबईसह राज्यभरात कोसळणा-या पावसानं रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पुण्याहून मुंबईकडे येणा-या अनेक एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलेले आहेत. तरी काही ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस आणि मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर एक्स्प्रेसही रद्द केल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. तर भुसावळ-पुणे आणि पुणे-भुसावळ या एक्स्प्रेसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.
शनिवारी कोसळलेल्या पावसानं तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवाही कोलमडली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकांत पाणी तुंबल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. मुसळधार पावसानं मुंबईकरांसह चाकरमानी प्रवाशांची तारांबळ उडाली. संततधार कोसळणा-या पावसामुळे अनेक एक्स्प्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या. रेल्वे रुळांवरील पाणी ओसरलं असलं तरी गाड्यांचा वेग मंदावलेलाच आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मध्य रेल्वेला बसला असून, मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत होत्या. तसेच मध्य रेल्वेवरून प्रवास करणा-या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्जतमध्येही रुळांवर पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती.