Rain Red Alert in Pune: सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला जायचे नियोजन असेल, तर विचार करूनच बाहेर पडा. कारण शुक्रवारपासून वाढलेला पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. राज्यातील काही भागांमध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मोठ्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार आगमन केले. गणपती आगमनाची लगबग सुरू असतानाच पावसाने जोर धरला आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा शनिवारी जोर वाढला. मुंबई, ठाणे, पालघर, पुण्यासह मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
१७ ऑगस्ट रोजी हवामान कसे असेल?
भारतीय हवामान विभागाने कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सोमवारीही (१८ ऑगस्ट) राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, बीड, लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे हजेरी
शनिवारी (१६ ऑगस्ट) राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी नद्यांची पाणीपातळी वाढली, तर पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये पाण्याचा ओघ वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील बारवी धरण शंभर टक्के भरले आहे. मराठवाड्यातील काही धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.