महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 05:23 IST2025-10-19T05:21:22+5:302025-10-19T05:23:48+5:30
ऐन दिवाळीच्या दरम्यान राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी आहे.

महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऐन दिवाळीच्या दरम्यान महामुंबईच्या पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. तर, रविवारपासून मुंबईच्या कमाल तापमान घसरण होण्याची शक्यताही आहे.
मुंबईतील हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, शुक्रवारी येथे कमाल तापमानाचा पारा ३७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. शनिवारी यात २ अंशाची घसरण झाली असून, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तापमानात घसरण झाली असली तरी मुंबईकरांना बसणारे उन्हाचे चटके कायम आहेत. तर, सोमवार, मंगळवार आणि बुधवारी महामुंबईत सायंकाळी पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिली.
सध्या मुंबईत सकाळी आल्हाददायी वातावरण असते. यावेळी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस असणे ही मुंबईच्या मानने चांगली गोष्ट आहे. आता गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ३५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान नोंदविले जात आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे समुद्र किनारी भागांवर लक्ष ठेवावे लागेल, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
राज्यात पुढील चार ते पाच दिवस काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यलो अलर्ट जारी आहे. हा पाऊस सर्वत्र नाही. बाकी ठिकाणी सरासरी तापमान राहील, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे रात्रीचे तापमान ऊबदार असेल, तर दिवसाचे तापमान तुलनेत कमी असेल, असेही त्यांनी सांगितले.