राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 12:29 PM2019-08-22T12:29:09+5:302019-08-22T12:34:04+5:30

राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते.

rain and flood crisis on sugar factory in the state | राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

राज्यातील गाळप हंगामावर ओल्या दुष्काळाचे संकट 

Next
ठळक मुद्देअतिवृष्टीने नुकसानीचा अंदाज : साखर कारखान्यांना आढावा घेण्याची सूचना

पुणे : गेल्यावर्षी पावसाने ओढ दिल्याने यंदा गाळपासाठी गत हंगामापेक्षा पावणेचारशे लाख टन ऊस कमी उपलब्ध होईल, असा अंदाज होता. कोल्हापूर आणि सांगली या ऊस लागवड क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान झाल्याने गाळपासाठी उपलब्ध होणाऱ्या उसाचे प्रमाण आणखी घटण्याची शक्यता आहे. मात्र, या नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना सूचना दिली आहे. येत्या २६ ऑगस्टला साखर आयुक्तालयात बोलावण्यात आलेल्या कारखानदारांच्या बैठकीत नुकसानीचा आढावा घेतला जाईल. 
राज्यातील एकूण उत्पादनाच्या पंचवीस ते तीस टक्के साखरेचे उत्पादन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होते. सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सर्वाधिक साखर उत्पादन होते. या चारही जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला आहे. त्यातही सांगली आणि कोल्हापूर जिल्हे तर जवळपास आठवडाभर पाण्याखाली होते. या दोन जिल्ह्यांत पूराचा जास्त तडाखा बसला आहे. 
गेल्यावर्षी महाराष्ट्रात पावसाने पाठ फिरविल्याने ऊस क्षेत्रात ११.५४ लाख हेक्टरवरुन ८.२३ लाख हेक्टर पर्यंत घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामामधे राज्यातील साखरेचे उत्पादन १०७ वरुन ७० लाख टनांपर्यंत खाली घसरेल, असा अंदाज साखर महासंघाने वर्तविला होता. लांबलेल्या पावसामुळे जून महिन्यात जिल्ह्यासह विविध ठिकाणी चारा छावण्या सुरु होत्या. त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऊस गेला. त्यामुळे यंदा ५७० लाख टन ऊस गाळपातून ६३ लाख टन साखर उत्पादित होईल, असे पुरस्थिती उद्भवण्या पुर्वी साखर आयुक्तालयाने सांगितले होते. 
पुरामुळे गाळपासाठी आणखी कमी ऊस उपलब्ध होईल. त्यामुळे साखरेसह मळी, इथेनॉल, ब गॅस आणि कोजनचे उत्पादनही निम्म्याने घटेल असा अंदाज आहे. दरवर्षी साधारण ४४ ते ४५ लाख टन मळीचे उत्पादन होते. यंदा त्यात २० ते २२ लाख टनापर्यंत घट होईल, असा अंदाज आहे. 
या बाबत माहिती देताना साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, अजूनही आम्ही ५७० लाख टन ऊस गाळप आणि ६३ लाख टन साखर उत्पादनावर ठाम आहोत. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी कृषी आणि साखर कारखान्यांकडेही विचारणा केली आहे. त्याचे पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे नुकसानीची माहिती प्राप्त होण्यासाठी आठ दिवस लागतील. 
--------------
-गेल्या हंगामामधे राज्यात ९५१ लाख टन ऊस गाळपातून १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातील २१५.९९ लाख टन कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यात झाले आहे. त्यातून २६.७४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्याने अगामी हंगामात येथील उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
..............
नुकसानीची अचूक माहिती घेण्याची सूचना साखर कारखान्यांना करण्यात आली आहे. यादृष्टीने २६ आॅगस्टला कारखान्यांच्या व्यवस्थापकांची बैठक बोलावण्यात आली आहे.  
शेखर गायकवाड, साखर आयुक्त
...........

Web Title: rain and flood crisis on sugar factory in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.