"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा", काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 15:40 IST2026-01-05T15:32:32+5:302026-01-05T15:40:40+5:30
Harshwardhan Sapkal Criticize Rahul Narvekar: संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला जातो पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे.

"राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा", काँग्रेसची मागणी
मुंबई महानगपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वागाच्या भोवऱ्यात सापडले होते. राहुल नार्वेकर हे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी उमेदवारांवर दबाव आणत होते, तसेच त्यांनी हरिभाऊ राठोड यांना धमकावले, असे आरोपही करण्यात येत होते. आता या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.
राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला जातो पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. राहुल नार्वेकर यांनी अध्यक्षपदाच्या आपल्या पहिल्या कारकिर्दीत पक्षातंर बंदी कायदा मोडीत काढून लोकशाही व संविधानाच्या छातीत सुरा खुपण्याचे काम केले, म्हणून त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. आता हे महाशय महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या नातेवाईकांसाठी अत्यंत खालच्या पातळीवर उतरले आहेत. विरोधकांना अर्ज भरू देण्यात अडथळा आणणे, विरोधकांना धमक्या देणे, पदाचा गैरवापर करणे अशा प्रकारचे वर्तन त्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. महामहिम राष्ट्रपती यांनी याची गंभीर दखल घेऊन नार्वेकर यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना धमकावल्या प्रकरणी काँग्रेस पक्षाने चौकशी करा व नार्वेकर यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी पत्र पाठवले होते पण निवडणुक आयोगाने पुरावे मागितले. घटनेच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आहे, ज्यांना अडवण्यात आले धमक्या दिल्या त्यांच्या तक्रारी घेऊन कारवाई करावी. आता चौकशी अहवाल आला असला तरी त्यात केवळ शब्दच्छल करण्यात आलेला आहे, असा दावाही त्यांनी केला.