विदर्भातील नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव धूळ खात

By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T01:12:28+5:302014-06-09T01:12:28+5:30

गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे

Proposals for new districts of Vidarbha eat dust | विदर्भातील नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव धूळ खात

विदर्भातील नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव धूळ खात

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी तर चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवा जिल्हा निर्माण करण्यात यावा, अशी  गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईलगत असलेल्या ठाणे जिल्ह्याचे १५ ऑगस्टपूर्वी विभाजन करण्यात येईल, अशी घोषणा  विधान परिषदेत केली. राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मिती प्रस्तावावर उदासीन आहे. आजवर अनेकदा अहिंसात्मक मार्गाने आंदोलन  करून जिल्हा निर्मितीची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. परंतु सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला  नाही.
गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात अहेरी उपविभाग नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील आहे. ही बाब लक्षात घेऊनच राज्याच्या  गृहमंत्रालयाने स्वतंत्र अहेरी जिल्हा तीन वर्षापूर्वीच घोषित केला. मात्र महसूल प्रशासन याबाबत उदासीन आहे. नवा जिल्हा निर्माण करण्याऐवजी  अहेरी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी देण्यात आला व जिल्हा निर्मितीची मागणी दाबून टाकण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. नाग विदर्भ आंदोलन  समितीसह अहेरी जिल्हा निर्माण संघर्ष कृती समितीने या प्रश्नावर सातत्याने जनआंदोलन केले आहे.
अहेरी उपविभागात असलेल्या पाच तालुक्यांसह आणखी सहा नवीन तालुके निर्माण करून अहेरी हा स्वतंत्र जिल्हा १५ ऑगस्ट २0१४ ला घोषित  करावा, अशी मागणी अहेरी परिसरातील जनतेने केली आहे.
राज्य सरकारने गेल्या अनेक  वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा नवीन जिल्हा निर्माण करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.  मुख्यमंत्र्यांनी चिमूरला जिल्ह्याचा दर्जा देण्याऐवजी नगर परिषद करण्यात येईल, अशी घोषणा एका कार्यक्रमात केली होती. मात्र नगर परिषद न करता  नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. चिमूर ही क्रांतिभूमी असल्याने स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा, अशी चिमूरवासीयांचीही मागणी आहे. परंतु  राज्य सरकार विदर्भातील नव्या जिल्ह्याच्या निर्मितीबाबत उदासीन आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
 

Web Title: Proposals for new districts of Vidarbha eat dust