Promise of language in party manifesto | पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन
पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन

ठळक मुद्देपक्षनेतृत्वांना पत्र : महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचा पुढाकार

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, त्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. भाषेच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करणारे पक्ष आणि उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन भाषाप्रेमींना करण्यात आले आहे. 
आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशी अभिवचने दिली जातील, असा आग्रह पक्ष नेतृत्वाने धरावा आणि मराठीच्या व्यापक हितासाठी हे पाऊल उचलावे, याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदींना ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे.
मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित मागण्या आणि प्रश्नांबाबत शासन दरबारी कायमच उदासीनता पाहायला मिळते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या प्रश्नांना कायम बगल दिली जाते. भाषेशी संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी २४ जूनला साहित्यिकांनी मुंबईत धरणे आंदोलन केले. 
यावेळी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. आश्वासनांची पूर्तता व्हावी, यासाठी या प्रश्नांकडे जाहीरनाम्यपासूनच लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत व्यक्त केले जात आहे.
...............

* मराठी शाळा पुन्हा सुरू करणार 
भाषेचे जतन, संवर्धनावर अंदाजपत्रकाच्या किती टक्के रक्कम खर्च करणार, मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या शाळा सुरू करून त्या पुन्हा बंद न पडण्याची काळजी घेणार, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी पूर्ण राजकीय बळ उभे करणार, मराठी विद्यापीठ त्वरित स्थापन करणार, बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करणार, त्यासाठी तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगालीप्रमाणे मराठी भाषा शिक्षण कायदा करणार, मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापणार, राज्य आणि विभागीय सांस्कृतिक विकास महामंडळांची स्थापना करणार, एवढ्या किमान बाबींची अभिवचने नि:संदिग्धपणे देणे व मराठी भाषिक समाजाने ती मागणे अतीव गरजेचे झाले आहे. असे करणारे पक्ष आणि उमेदवारांचाच मतदारांनी विचार करावा, अशी मोहीम लवकरच साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि संस्थांतर्फे  हाती घेतली जाणार आहे.
.......

आपल्या भागातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, पक्ष प्रवक्ते यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशी अभिवचने द्यावीत, असा आग्रह आपण धरला पाहिजे. यासाठी भाषाप्रेमी, साहित्यिक अशा सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. - डॉ. श्रीपाद जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी
...........
 


Web Title: Promise of language in party manifesto
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.