राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:17 IST2025-09-06T13:13:32+5:302025-09-06T13:17:16+5:30

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

President presents 'National Teacher Awards' to 6 teachers from Maharashtra | राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात डॉ. शेख मोहम्मद वकिउद्दीन शेख हमीदोद्दीन (जिल्हा परिषद हायस्कूल, अर्धापूर, नांदेड), सोनिया विकास कपूर (एटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल नं. २, मुंबई), डॉ. संदीपन गुरुनाथ जगदाळे (दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स, लातूर), डॉ. नीलाक्षी जैन (शाह अँड अँकर कच्छी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई), प्रा. पुरुषोत्तम पवार (एस. व्ही. पी. एम. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग, बारामती) आणि कौशल्य विकास क्षेत्रातील अनिल रामदास जिभकाटे (संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर) यांचा समावेश आहे.

देशातील ४५ शालेय शिक्षकांचा सन्मान
मुर्मू यांनी देशातील ४५ शालेय शिक्षक, २१ उच्च शिक्षण आणि १६ कौशल्य विकास क्षेत्रातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार, जयंत चौधरी, शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव देबाश्री मुखर्जी उपस्थित होते.

पुरस्काराचा उद्देश काय?
या पुरस्काराचा उद्देश शिक्षकांचे समर्पण, नावीन्यपूर्ण कार्यपद्धती आणि विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करणे हा आहे. मागील काही वर्षांपासून या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

शिक्षकांचे योगदान भारताला सुपर पॉवर बनवेल: मुर्मू  
राष्ट्रपती मुर्मू यांनी बोलताना ‘आचार्य देवो भव’ असा शिक्षकांचा उल्लेख करीत, त्यांचे समाजातील सर्वोच्च स्थान अधोरेखित केले. शिक्षक मुलांमध्ये आत्मसन्मान आणि सुरक्षितता जागवतात. त्यांचे यश हेच शिक्षकांचे खरे बक्षीस आहे, असे त्या म्हणाल्या. सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी मुलींच्या ४३% नोंदणीबद्दल समाधान व्यक्त केले. भारताला कौशल्याची राजधानी आणि सुपर पॉवर बनवण्यात शिक्षकांची भूमिका निर्णायक आहे, असे त्यांनी सांगितले.

Web Title: President presents 'National Teacher Awards' to 6 teachers from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.