विकृत कोरटकरचा नवा प्रताप; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जुने फोटो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:55 IST2025-03-22T13:54:14+5:302025-03-22T13:55:59+5:30
प्रशांत कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

विकृत कोरटकरचा नवा प्रताप; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जुने फोटो?
Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा विकृत प्रशांत कोरटकर फरार आहे. या कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र शोध घेत असलेल्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रशांत कोरटकरने आपला जुना फोटो शेअर केल्याची माहिती असून तो महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याला बेड्या ठोकण्यासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपुरात पोहोचले आहेत. परंतु तो अद्याप हाती लागलेला नाही. अशातच त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्याने तो देशाबाहेर पसार झाल्याची चर्चा रंगू लागली. मात्र हा फोटो जुना असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून त्याचा शोध सुरू आहे.
नागपूर पोलिसांकडून सहकार्य नाही?
प्रशांत कोरटकरचा शोध घेत असताना नागपूर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य केलं जात नसल्याचं कोल्हापूर पोलिसांचं म्हणणं आहे, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. कोरटकर याची पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मैत्री आहे. तसंच त्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचेही अनेक फोटो समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरटकरला अद्याप अटक न झाल्याने गृहखात्याच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी
कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याने प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दाखल केलेली याचिका तहकूब करून सोमवारी न्यायालयासमोर सुनावणी होत आहे. अटक टाळण्यासाठी कोरटकरने प्रयत्न सुरू केले आहेत.