काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 15:07 IST2018-12-20T14:45:53+5:302018-12-20T15:07:20+5:30
प्रकाश आंबेडकर यांचं काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीकास्त्र

काँग्रेस, राष्ट्रवादीचं जागावाटप पूर्ण; आमच्याशी बोलणी म्हणजे निव्वळ फार्स- आंबेडकर
मुंबई: भाजपाविरोधात महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरू असलेला हा आघाडीचा प्रयत्न म्हणजे निव्वळ फार्स असल्याचं टीकास्त्र भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोडलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं लोकसभेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. त्यामुळे आम्हाला आघाडीत घेण्यासाठी त्यांच्याकडून सुरू असलेला प्रयत्न हा निव्वळ दिखावा असल्याचं आंबेडकर म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे. मात्र यावर आंबेडकरांनी जोरदार टीका केली आहे. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं लोकसभा निवडणुकीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालं. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्याबद्दलची चर्चा म्हणजे केवळ फार्स आहे,' अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला लक्ष्य केलं.
भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भारिपा बहुजन महासंघानं एमआयएमसोबत आघाडी केली आहे. मात्र भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत यायचं असल्यास त्यांनी एमआयएमची साथ सोडावी, अशी काँग्रेस, राष्ट्रवादीची अट आहे. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनीदेखील प्रयत्न केले होते.