"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 14:42 IST2025-01-25T14:38:37+5:302025-01-25T14:42:43+5:30
मनोज जरांगे पाटील स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी असल्याचा दावा वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

"मनोज जरांगेंनी भाजपला सत्तेत बसवलं, मराठा आरक्षणासाठी स्वतःच दोषी"; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील हे अंतरावालीत सातव्यांदा उपोषण करत आहेत. यावेळी सरकारवर टीका करताना राज्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात यावे, तसा जीआर काढावा, अशा मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर टीका केली आहे. मनोज जरांगेंनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवलं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. सरकार मराठा समाजाच्या मागण्या मान्य करेल, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील हेच दोषी असल्याचा आरोप केला आहे.
"मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत. त्यांचे हे उपोषण जरांगे पाटील विरुद्ध सुरेश धस असे गृहित धरायचे का? की दुसरे काही म्हणायचे? शेतकरी कर्जमाफीला जसे शेतकरी दोषी आहेत, तसेच मराठा आरक्षणासाठी स्वतः जरांगे दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेत नेऊन बसवले," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले, पण भाजपला टार्गेट केले नाही. त्यामुळे त्यांनीच भाजपला सत्तेत नेऊन बसवले. विशेष म्हणजे हीच भाजप त्यांना सर्टिफिकेट देण्यास तयार नव्हती," असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.