अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:58 IST2024-12-20T11:55:49+5:302024-12-20T11:58:43+5:30
Amit Shah Sanjay Raut Prakash Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अमित शाहांविरोधात प्रकाश आंबेडकर संजय राऊत आले एकत्र; काय केली मागणी?
Prakash Ambedkar Amit Shah Sanjay Raut: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अमित शाहांच्या विधानावरून महाराष्ट्रातही विरोधक आक्रमक झाले असून, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट इशाराच दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीला शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून विरोधकांनी भाजपला घेरल्याचे चित्र आहे. अमित शाह यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
अमित शाह यांच्या विधानाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि खासदार संजय राऊत यांचे एकमत झाल्याचे दिसले. प्रकाश आंबेडकरांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याचबरोबर राजीनामा न दिल्यास काय करणार, याबद्दलचा इशाराही दिला. त्याला राऊतांनी पाठिंबा दिला.
प्रकाश आंबेडकर-संजय राऊतांनी काय केली मागणी?
प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट शेअर करत आम्ही कारवाईची वाट बघतोय असे म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले होते की, अमित शाह यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा. नाहीतर आम्ही आंबेडकरविरोधी मानसिकतेच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढा देऊ. अमित शाह, तातडीने राजीनामा द्या. जय भीम, जय संविधान, अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली.
waiting for action! https://t.co/B7PxKQtzrH
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 20, 2024
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची राजकीय आघाडी फिस्कटल्यानंतर संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर एकमेकांना लक्ष्य करताना दिसले. प्रकाश आंबेडकरांनी थेट संजय राऊतांवर निशाणा साधला होता. संजय राऊतांनी पाठीत खंजीर खुपसल्याची एक पोस्टही आंबेडकरांनी केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत आंबेडकरांच्या भूमिकेचे समर्थन करताना दिसले.