"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 19:42 IST2025-10-30T19:42:35+5:302025-10-30T19:42:56+5:30
Powai Hostage Case: शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामाचे पैसे न मिळाल्याने रोहित आर्य याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’
रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने मुंबईतील पवई परिसरात काही मुलांना ऑडिशनसाठी बोलावून ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना आज घडली. मात्र पोलिसांनी शिताफीने घटनास्थळी दाखल होत रोहित आर्य याचा एन्काऊंटर करत मुलांची सुटका केली. पोलिसांशी झालेल्या चकमकीत रोहित आर्य याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामाचे पैसे न मिळाल्याने रोहित आर्य याने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यावर आता माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्य याने सरकारने आपले दोन कोटी रुपये थकवल्याचा आरोप केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना दीपक केसरकर म्हणाले की, मी शिक्षणमंत्री असताना रोहित आर्य यांना वैयक्तिकरीत्या मदत केली होती. मी चेकद्वारे त्यांना स्वत: पैसे दिले होते. पण सरकारकडून पैसे मिळवण्यासाठी काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. दोन कोटी रुपये येणे आहे, असा त्यांनी केलेला दावा मला योग्य वाटत नाही, असे दीपक केसरकर म्हणाले होते.
रोहित आर्य हे सरकारच्या अभियानात सहभागी झाले होते. तसेच त्यासाठी ते मुलांकडून थेट शुक्ल आकारायचे असं विभागाचं म्हणणं आहे. मात्र रोहित आर्य यांनी आपण कुठलीही फी घेतली नव्हती, असं स्पष्टीकरण दिलं होतं. याबाबत त्यांनी शिक्षण विभागाशी बोलून प्रश्न सोडवायला हवा होता, असेही केसरकर यांनी सांगितले.
दरम्यान, रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दीपक केसरकर मंत्री असताना शिक्षण विभागाशी संबंधित एका शाळेच्या कामासाठी त्याला टेंडर मिळाले होते. मात्र त्या कामाचे पैसे अद्याप मिळाले नाहीत असा आरोप रोहित आर्यने केला. केसरकर मंत्री असताना रोहित आर्य याने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते अशी माहिती समोर येत आहे