Porn videos watch increasing in the Indian children | भारतीय मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढले
भारतीय मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढले

ठळक मुद्दे इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढत आहे. उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांचा परिणाम संप्रेरकारांच्या असंतुलनावर मुलांचा स्क्रीन टाईम ठरवून दिल्यास नियंत्रण ठेवणे शक्य

प्रज्ञा केळकर-सिंग- 
पुणे : १३ वर्षांचा सोहम सतत मोबाईल बघायचा. मोबाईल पाहत असताना आई- बाबा किंवा कोणीही जवळ गेले तरी तो चिडत असे. काही काळाने तो खोली बंद करून व्हिडीओ बघायला लागला. एक दिवस त्याने आईचा फोन वापरल्याने तिने हिस्ट्री तपासली आणि तिला धक्काच बसला. सोहम मोठ्या माणसांसाठी असलेले पॉर्न व्हिडीओ बघत असे. अखेर खूप प्रयत्न करून, समुपदेशक आणि शिक्षकांच्या मदतीने त्याला महत प्रयत्नांनी बाहेर काढता आले. इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे किशोरवयीन मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ बघण्याचे प्रमाण वाढत आहे. ११-१४ या वयोगटातील मुलांमध्ये हे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने निरीक्षण जाणकारांकडून नोंदवले गेले आहे. 
सध्याच्या जगात स्मार्टफोन अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे. तंत्रस्नेही होण्याच्या नादात आपण आभासी जगाच्या जवळ आणि वास्तव आयुष्यापासून दूर चाललो आहोत. मुलांमध्ये निर्माण होणाºया समस्यांनाही फोन आणि त्यावरून उपलब्ध होणारे इंटरनेट कारणीभूत ठरत आहे. मुलांमध्ये पॉर्नोग्राफीविषयी आकर्षण वाढल्याने पालकांसह शिक्षक आणि समुपदेशकही चक्रावून गेले आहेत. विद्यार्थी नको त्या वयात चुकीच्या पद्धतीने लैंगिकतेविषयी जाणून घेत बालपण गमावत आहेत. 
‘लोकमत’शी बोलताना सायबरतज्ज्ञ मुक्ता चैैतन्य म्हणाल्या, ‘आपल्याकडे लग्नाचे, मतदानाचे वय ठरलेले आहे. मग, मोबाईल मुलांच्या हाती देण्यासाठी विशिष्ट मर्यादा का पाळली जात नाही? आपल्याकडे पैैसे आहेत आणि मुलांना द्यायला वेळ नाही म्हणून मोबाईल घेऊन देणे अजिबात समर्थनीय नाही. कोणत्याही माध्यमांचे दुष्परिणाम कळण्याची समज मुलांमध्ये नसते. पीअर प्रेशरमुळेही मुले चुकीच्या मार्गावर जातात. इतर मुलांकडून होणाºया टिपण्णीमुळेही मुले पॉर्नोग्राफीकडे  वळतात. चुकीच्या वयात चुकीच्या गोष्टी पाहून मुलांच्या मनात चुकीच्या कल्पना तयार होतात. भविष्यात याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.’
........
जागतिकीकरणामुळे प्रत्येकाच्या हातात तंत्रज्ञान आले आहे. पूर्वी लहान मुलांच्या हातात कोणतेही माध्यम नव्हते. आता मुलांना स्मार्ट फोन सहज उपलब्ध झाला आहे. पालकांचे मुलांवर नियंत्रण राहिलेले नाही. कधी प्रतिष्ठेसाठी, तर गरज, सुरक्षा अशा कारणांमुळे पालक मुलांना मोबाईल घेऊन देतात. त्यातून मुलांना मोबाईलचे व्यसन जडू लागते. इतर मुलांकडून पॉर्न व्हिडीओ, पॉर्नोग्राफिक वेबसाईटबद्दल मुलांना माहिती मिळते आणि त्यांचे कुतूहल जागे होते. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांना लहान वयातील एक्स्पोजर टाळले पाहिजे. मुले मोबाईल वापरत असतील तर पासवर्ड घालू न देणे, विशिष्ट अ‍ॅप्लिकेशन्सच्या सहाय्याने मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे, मुलांचा फोन पालकांच्या ई-मेलला जोडून ठेवणे अशा उपायांचा अवलंब पालकांनी केला पाहिजे. पालकांकडून वेळ, भावनिक पाठिंबा मिळत नसल्याने बरेचदा मुले एकलकोंडी आणि निराश होतात. त्यांच्यामध्ये नकारात्मकतेची भावना निर्माण झाल्याने पॉर्नोग्राफीकडे वळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुलांशी संवाद साधणे, चांगले-वाईट यातील फरक समजावून सांगणे, उपदेशाचे डोस न पाजता मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी वागणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ
.............
सोशल मीडिया, हद्दपार झालेली एकत्र कुटुंबपद्धती, पालक आणि मुलांमध्ये निर्माण झालेला अनेक दुरावा मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना कारणीभूत ठरत आहे. मुलांमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहण्याचे प्रमाण वाढण्याची कारणे व परिणाम याबाबत मी ‘वैद्यकीय कामशास्त्र’ या पुस्तकामध्ये विस्तृतपणे लिहिले आहे. उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांचा परिणाम संप्रेरकारांच्या असंतुलनावर होत आहे. - डॉ. शशांक सामक, वैैद्यकीय तज्ज्ञ.

...............
मुलांच्या गॅझेट वापरावर पालकांचे नियंत्रण असले पाहिजे. मुले काय पाहतात, हे पालकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. मुलांचा स्क्रीन टाईम ठरवून दिल्यास नियंत्रण ठेवणे शक्य होते. मुले पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्यावर पालकांनी आरडाओरडा करू नये. त्यांना समजून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. समुपदेशकांकडे जाण्यास कमीपणा वाटण्याची गरज नाही.- मुक्ता चैैतन्य, सायबर अभ्यासक

Web Title: Porn videos watch increasing in the Indian children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.