उद्योगनगरीत अवघा रंग एक झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:17 IST2018-07-06T22:17:23+5:302018-07-06T22:17:31+5:30
उद्योगनगरीत तुकोबांच्या पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले.

उद्योगनगरीत अवघा रंग एक झाला
पिंपरी : उद्योगनगरीत तुकोबांच्या पालखीचे दिमाखात स्वागत करण्यात आले. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. लहान-थोर, स्त्री-पुरुष सगळेच पालखीमध्ये सहभागी झाले होते. पालखीच्या स्वागतासाठी तरुणांचा उत्साह वाखण्याजोगा होता. संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखीचे शहरामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता आागमन झाले. पालिकेच्या वतीने स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकामध्ये शहरवासीयांनी उत्साहात स्वागत केले. टाल मृदृंगाच्या गजराने उद्योगनगरी अक्षरश: दुमदुमली होती. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी शहरात दाखल होणार म्हणून भक्ती-शक्ती चौकामध्ये नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. महापालिकेच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. सायंकाळी 5:25 वाजता पालखीचे आगमन झाल्यावर अवघी उद्योगनगरी भक्तीरसात न्हाउन निघाली. गळ््यात तुळशी माळ, कपाळी गंध, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशी व मुखी विठ्ठुनाम घेत वारीत सहभागी झालेल्या वारकºयांचा उत्साह पाहण्यासारखा होता. तेवढ्याच उत्साहने शहरातील नागरिकही वारीत सहभागी झाले. भक्ती शक्ती चौकात महापालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी स्वागत केले. तसेच महापौर तसेच आमदार महेश लांडगे यांनी रथाचे सारथ्य केले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार गौतम चाबुकस्वार हेही सहभागी झाले होते.