Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 20:01 IST2025-11-01T19:59:53+5:302025-11-01T20:01:24+5:30
Phaltan Doctor Death Tejaswi Satpute IPS: फलटणमधील डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
Tejaswi Satpute Phaltan Doctor Death Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तरुणीने आत्महत्या केली की, तिची हत्या झाली, असे प्रश्नही विचारले जात आहे. शंकांच्या वावटळी उठू लागल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिले होते. त्यानंतर आयपीएस अधिकारी अश्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर तरुणी कार्यरत होती. तिने फलटणमधील एका हॉटेलमधील खोलीत आत्महत्या केली. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली होती. त्यावर निलंबित आयपीएस अधिकारी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहिलेली होती. बदनेने चार वेळा बलात्कार केल्याचे लिहिले होते. तर प्रशांत बनकरनेही शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केलेला आहे.
पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते करणार प्रकरणाचा तपास
मयत डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही नाव आले आहे. त्यांच्या दोन पीएकडूंन बोगस पोस्टमॉर्टेम रिपोर्ट देण्यासाठी दबाव टाकला गेल्याची तक्रारही तरुणीकडून केली गेली होती. या प्रकरणात तरुणीची हत्या झाल्याचे आरोप केले जात असून, हातावरील सुसाईड नोट दुसऱ्याच व्यक्तीने लिहिली असल्याचे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.
डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरण गुंतागुंतीची बनले असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवला आहे. आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली असून, प्रकरणाचा तपास तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.