इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:17 IST2025-02-08T17:17:31+5:302025-02-08T17:17:40+5:30

'संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते'

People have misunderstood the false narrative of India Aghadi says Minister Chandrakant Patil | इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

पोपट पवार

कोल्हापूर : कर्नाटकात यश मिळाले किंवा केंद्रात एनडीएची पीछेहाट झाली की ईव्हीएम चांगले अन् महाराष्ट्रातील निकाल लागले की भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे. लोकांना इंडिया आघाडीची ही गोष्ट समजली आहे. त्यांचे खोटे नरेटिव्ह आता कळून चुकले आहे, त्यामुळे विधानसभेला त्यांनी ही चुक दुरुस्त केली, या शब्दांत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंत्री पाटील म्हणाले, सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचे दिल्ली विधानसभा निकालावरुन स्पष्ट झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत थोडी गडबड झाली, मात्र, लोकांना खोटा नरेटिव्ह पसरवले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विधानसभेत ही चूक दुरुस्त केली. हरियाना, महाराष्ट्र व दिल्लीतही यश मिळाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा संपला नाही, संपणार नाही.

संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते

दिल्लीत काँग्रेस-आप एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता या संजय राऊत यांच्या विधानाचाही मंत्री पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेस-आपला एकत्र यायला कुणी अडवले होते का?, संजय राऊत महान नेते आहेत, ते या दोघांमधील समझोता करु शकले असते असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला पाठिंबा न देता शिवसेनेने आपला पाठिंबा दिला येथेच मोठी ठिणगी पडली. त्यामुळे इतरांनी आघाडीतून बाहेर जाण्यापेक्षा काँग्रेसच आघाडीतून बाहेर पडते की काय अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.

राऊत यांनी जादूची कांडी फिरवावी

संजय राऊत यांना जादूच्या कांडीने अशा प्रकारे चांगले निकाल लागू शकतात असे वाटत असेल तर त्यांनी रोज सकाळी पत्रकारांशी बोलण्यापेक्षा साधना करावी अन जादूची कांडी फिरवावी असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला.

..म्हणून आरडाओरडा नको

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा २ कोटी ४२ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मग, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचे की अर्धा भरलेला आहे, असे म्हणायचे? कार असलेले, इन्कम टॅक्स भरलेला किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेल्या ५ लाख महिलांना वगळण्यात आले. यामध्ये इतके आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही, तशी कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: People have misunderstood the false narrative of India Aghadi says Minister Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.