प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:07 IST2025-11-07T17:06:42+5:302025-11-07T17:07:38+5:30
Parth Ajit Pawar Pune Land Scam news:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्याने अजित पवार यांच्या प्रतिमेला तगडा झटका लागण्याची शक्यता आहे.

प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता
पार्थ पवार यांनी पुण्यातील १८०० कोटींची महार वतनाची जमीन ३०० कोटींना विकत घेतल्याचे प्रकरण आता शेकण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडण्याच्या हालचाली अजित पवारांकडून सुरु झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिवसभरात दोनवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून हे प्रकरण शांत करण्याची तयारी सुरु केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्याने अजित पवार यांच्या प्रतिमेला तगडा झटका लागण्याची शक्यता आहे. यामुळे पार्थ पवार ही जमीन सरकारकडे परत देऊन राज्यभरात तापत चाललेले प्रकरण शांत करण्याची शक्यता आहे. पार्थ आणि अजित पवार यांच्याविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. अजित पवार यांचा राजीनामा मागितला जात आहे. गुन्हा दाखल करताना पार्थ यांच्या मामेभावावर जो त्या कंपनीत केवळ १ टक्क्याचाच भागीदार आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरूनही पार्थ पवारांना वाचविले जात असल्याची टीका विरोधक करत आहेत.
अजित पवार, पार्थ पवार यांच्याविरोधात आंबेडकरी संघटनांकडून आंदोलने सुरु झाली आहेत. यामुळे हा जमीन घोटाळा निवडणुकांच्या तोंडावर शेकू नये म्हणून अजित पवारांकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. हल्लीच्या काळातील हा भाजप प्रणित महायुतीचा दुसरा मोठा जमीन घोटाळा आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन घोटाळ्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आले होते. यानंतर विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने या जमिनीचा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आला होता. आता त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच दुसरा मोठा जमिनी हडपण्याचा घोटाळा समोर आल्याने महायुतीला देखील हे प्रकरण अवघड झाले आहे. या प्रकरणातही जैन बोर्डिंग प्रकरण शांत करण्याचा जो रस्ता अवलंबण्यात आला तोच वापरला जाण्याची शक्यता आहे.