सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 11:17 IST2025-10-12T11:16:09+5:302025-10-12T11:17:09+5:30
त्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.

सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण, २९ जिल्ह्यांतील ४१ लाख हेक्टरचे पंचमाने प्रलंबितच; अहवालास दहा दिवसांची प्रतीक्षा
पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे केवळ सप्टेंबरमध्ये तब्बल ४७ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून याचे पंचनामे करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५ जिल्ह्यांमधील सुमारे ६ लाख हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ४१ लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यासाठी दिवाळीच उजाडणार आहे. पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुन्हा शासन निर्णय जारी होईल. त्यानंतरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
राज्यात खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या काळात एकूण २५ लाख ६८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली होती, तर केवळ सप्टेंबर महिन्यात तब्बल ४७ लाख ३ हजार ७८१ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. त्यामुळे एकूण बाधित क्षेत्र ७२ लाख ७१ हजार ७८१ हेक्टर इतके झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी ते ऑगस्ट या काळातील नुकसानीसाठी यापूर्वीच २ हजार ५४२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून त्याचे वाटप सुरू आहे. सप्टेंबरमध्ये तब्बल ३४ जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. अजूनही २९ जिल्ह्यांमधील अहवाल मिळालेले नाहीत.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या म्हणण्यानुसार, काही जिल्ह्यांत शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून होते. त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्यास १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. साहजिकच अहवाल प्राप्त होण्यासही उशीर होऊ शकतो. हा अहवाल आल्यानंतर महसूल विभागाकडून याचा पुन्हा शासन निर्णय जारी केला जाईल. यात प्रत्यक्ष नुकसान झालेल्या क्षेत्र व मदत याचा उल्लेख केला जाणार आहे. त्यानंतरच मदत जमा केली जाणार आहे.
जिल्हानिहाय पंचनाम्यानुसार नुकसान क्षेत्र --
जिल्हा क्षेत्र (हे.) शेतकरी नुकसान
सातारा ४२०४ ११०४५ ६.२५ कोटी
कोल्हापूर १६९७ ५८६० २.७६ कोटी
हिंगोली ५५३७३ १०५१२० ६४.६२ कोटी
बुलढाणा ३३३६९४ ४०४९०८ २८९.२७ कोटी
वर्धा १६७४७७ १४९५४६ १४२.४० कोटी
एकूण ५९८३४६ ७१११९८ ५४२.६५ कोटी
सप्टेंबरमधील पंचनामे अद्याप अपूर्ण
सातारा, कोल्हापूर, हिंगोली, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांचेच अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाले. त्यानुसार ५ लाख ९८ हजार ३४६ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. याचा फटका ७ लाख ११ हजार १९८ शेतकऱ्यांना बसला असून जाहीर केलेल्या मदतीनुसार शेतकऱ्यांना ५४२ कोटी ६५ लाखांची मदत मिळणार आहे.