Kashinath Chaudhary: काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला अखेर 'ब्रेक', दबाव वाढल्याने भाजपचा 'यू टर्न'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:39 IST2025-11-18T09:37:33+5:302025-11-18T09:39:12+5:30
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याचे आरोप भाजपने केले होते. त्याच काशिनाथ चौधरी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतल्याने भाजपविरोधात देशभर राळ उठली होती.

Kashinath Chaudhary: काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला अखेर 'ब्रेक', दबाव वाढल्याने भाजपचा 'यू टर्न'
हितेन नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर: डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याचे आरोप भाजपने केले होते. त्याच काशिनाथ चौधरी यांचा भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतल्याने भाजपविरोधात देशभर राळ उठली होती. मात्र, भाजपवर दबाव वाढल्याने अखेर सोमवारी भाजपने याबाबत यू टर्न घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष राजपूत यांना पत्र पाठवून या घटनेची संवेदनशीलता पाहता, काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तत्काळ स्थगिती देत असल्याचे जाहीर केले.
डहाणू विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला काशिनाथ चौधरींचा प्रभाव असलेल्या भागातून मोठा फटका बसल्याचे दिसून आले होते. तसेच डहाणू नगर पालिका आणि पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना या भागात संभाव्य फटका बसण्याची शक्यता पाहता, भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी काशिनाथ चौधरी यांचा रविवारी डहाणू येथील कार्यक्रमात पक्षप्रवेश करून घेतला.
महाविकास आघाडीतून मोठा मासा गळाला लावण्यात यश मिळवले, असे समर्थक जाहीरपणे सांगू लागले होते. तथापि, प्रसारमाध्यमांवर या प्रवेशाबाबतचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या भूमिकेविरोधात खुद्द भाजपमधील काहींनी व विविध संघटनांमधून मोठा विरोध होऊ लागला. प्रसारमाध्यमांवर साधू हत्याकांडाबाबत सुरू झालेली चर्चा लक्षात घेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघरचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवून चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तत्काळ स्थगिती दिली.
काय आहे प्रकरण?
डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे १६ एप्रिल २०२० रोजी रस्ता चुकल्याने गडचिंचले भागात प्रवेश केलेल्या कल्पवृक्ष गिरी ऊर्फ चिकणे महाराज (७०), सुशील गिरी महाराज (३५) आणि त्यांचा चालक नीलेश तेलगंडे (३०) यांना मुले पळवणारी टोळी व चोर असल्याचा गैरसमज स्थानिकांनी करून घेतला. वन विभागाच्या चौकीत लपलेल्या दोन साधूंची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या झाल्याचे पडसाद देशभरात उमटले होते. या निर्घृण हत्येमागे पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती काशिनाथ चौधरी हे प्रमुख आरोपी असल्याने सीबीआयच्या चार्जशीटमध्ये त्यांना प्रमुख आरोपी करावे, अशी मागणी भाजपचे संतोष जनाठे यांनी लावून धरली होती.