लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:44 IST2025-07-09T05:43:42+5:302025-07-09T05:44:45+5:30
स्वयंमूल्यांकन प्रक्रिया बंद, तालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार

लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
मुंबई : राज्यातील सुमारे एक लाख नऊ हजार शाळांना १५ जुलै ते ३१ जुलैदरम्यान शाळाबाह्य मूल्यांकन पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्व शाळांना दिले आहे.
तसेच ३० जूनपासून स्वयंमूल्यांकनाची ऑनलाइन लिंक बंद केली असून, आता सर्व शाळांना बाह्य मूल्यांकनाचा टप्पा पूर्ण करणे अनिवार्य आहे. यंदाच्या बाह्य मूल्यांकनात राज्यातील पीएमश्री शाळांचाही समावेश आहे. ‘एससीईआरटी’ने फेब्रुवारीमध्ये बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया घोषित केली होती. मात्र, परीक्षा, विविध प्रशिक्षण सत्रे आणि निवडणुकीच्या कामांमुळे अनेक शाळांना वेळेवर स्वयंमूल्यांकन करता आले नाही. आता १०० टक्के स्वयंमूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणण्याचे नियोजन ‘एससीईआरटी’चे संचालक राहुल रेखावार यांनी जाहीर केले आहे.
बाह्य मूल्यांकन नियोजन, प्रक्रिया
तालुकास्तरावर स्वतंत्र पथकांची स्थापना करणार.
प्रत्येक पथकात ४ सदस्य असतील.
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी किंवा केंद्रप्रमुख पथकप्रमुख म्हणून काम पाहतील.
एक पथक एक दिवसात एका शाळेचे मूल्यांकन करणार.
ही प्रक्रिया जास्तीत जास्त ६ दिवसांत पूर्ण केली जाणे अपेक्षित.
जिल्हास्तरावर बाह्य मूल्यांकन ३१ जुलैपूर्वी पूर्ण करणे अनिवार्य.
मूल्यांकन कोणासाठी?
शासकीय शाळा, खासगी अनुदानित, खासगी विनाअनुदानित, तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा. राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना बाह्य मूल्यांकन प्रक्रियेत सहभागी होणे बंधनकारक.