राज्याला ‘मुसळधार’चा ऑरेंज अलर्ट; मान्सूनपूर्व तडाख्याने पिकांचा चिखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 07:10 IST2025-05-17T07:10:25+5:302025-05-17T07:10:42+5:30
मराठवाड्यात पंधरवड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू, वाशिम जिल्ह्यात भुईमुगाचे नुकसान, फळबागांसह भाजीपाला पिकांचीही अतोनात नासाडी

राज्याला ‘मुसळधार’चा ऑरेंज अलर्ट; मान्सूनपूर्व तडाख्याने पिकांचा चिखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस अवकाळी पाऊस होणार आहे. राज्यातदेखील पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, दि. २१ व २२ मे रोजी कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या अंदाजामुळे केरळ, तसेच महाराष्ट्रातदेखील मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा, सिक्किम, आसाम या राज्यात मुसळधार पाऊस झाला, तर पश्चिम किनापट्टी, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, दिल्ली,पंजाब, हरियाणा,पूर्वोत्तर राज्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस नोंदविण्यात आला. दरम्यान, राज्यात पुढील आठवड्यातदेखील पाऊस राहणार आहे.
धाराशिवला तिसऱ्या दिवशी तडाखा
तीन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात विविध भागात मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. गुरुवारी रात्री धाराशिव शहरासह तुळजापूर व अन्य भागातही मोठा पाऊस झाला. परिणामी भाजीपाला पिकांचे नुकसान झालेे.
हिंगोली जिल्ह्यात भुईमुगाला फटका
हिंगोली जिल्ह्यात गुरुवारच्या वादळी पावसाने उन्हाळी भुईमूग, भाजीपाला व फळबागांचे नुकसान झाले. वादळामुळे शेतशिवारातील सौरऊर्जा प्लेट वाकल्या. सेनगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये भुईमुगाचे नुकसान झाले.
जालना जिल्ह्यात २ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, फळबागा झोडपल्या
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस होत आहे. जूनचा अनुभव यंदा मे महिन्यातच येत आहे. या बदललेल्या वातावरणाचा फटका सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांसह फळबागांना बसला. यात सर्वाधिक म्हणजे २ हजार हेक्टरबाधित क्षेत्र जालना जिल्ह्यात असून पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या पंधरवड्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगरसह विभागात सरासरी ३४ अंश से. कमाल, तर २४ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली. १६ मे सकाळपर्यंत मराठवाड्यात १२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर १ ते १६ मे पर्यंत १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. १ मे ते आजवर वीज पडून सहाजणांचा मृत्यू झाला.