महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:21 IST2025-11-12T09:19:28+5:302025-11-12T09:21:30+5:30
Ashish Shelar News: महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.

महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
मुंबई - महायुतीच्या त्सुनामीपुढे विरोधक आपापली घरे वाचविण्यासाठी पळापळ करीत असल्याचे चित्र आहे, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे मुंबई पालिका निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित ‘निवडणूक आणि महाराष्ट्राचे राजकारण’ या विषयावरील वार्तालापात शेलार बोलत होते. ते म्हणाले, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. ते एकत्रित निवडणूक लढणार असे गृहीत धरले तर महायुतीची भीती वाटल्याने त्यांना एकत्र यावे लागले, असा निष्कर्ष निघू शकतो.
मनसेतर्फे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सोमवारी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित करत, भाजपला परप्रांतीय महापौर करायचा आहे, असा आरोप केला. त्यावर शेलार म्हणाले, “दुबार मतदार म्हणून मराठी, भूमिपुत्र, हिंदूच नावे कशी आणता? तुमचा प्रवास अहिंदू आहे. तुम्ही सुरुवातीला बिहारींविरुद्ध बोलला, मग उत्तर भारतीयांविरुद्ध, त्यानंतर हिंदी भाषिक, जैन, गुजरातींविरुद्ध बोलला, आणि आता भूमिपुत्र. त्यामुळे तुम्हीच तुष्टीकरण करत आहात. मनसे आणि उद्धवसेना दुबार मुस्लीम मतदारांची नावे देत नाही, कारण त्यांना मुंबईत अल्पसंख्याक मुस्लीम महापौर करायचा आहे का?”
‘त्यांचे ५० जागी नगरसेवक निवडून येणेही कठीण’
आम्ही युतीत सडलो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्याने २०१७ ची महापालिका निवडणूक स्वतंत्र लढलो. ते बाहेर पडले आणि मुंबईकरांनी त्यांना फटका दिला. १००च्यावर जागा असलेला त्यांचा पक्ष २०१७ मध्ये ८४ वर आला आणि भाजप ३२ वर असलेला ८२ वर गेला.
त्यामुळे त्यांचा आलेख हा उतरता आहे, हे लक्षात घेता त्यांचा आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या सगळ्या पक्षांना मिळून या महापालिका निवडणुकीत मुंबईत ५०-५५ नगरसेवक निवडून आणणेही कठीण जाईल, असे शेलार एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.