OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:38 IST2025-09-06T10:37:10+5:302025-09-06T10:38:16+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी येथे केला आहे.

OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपविणारा काळा कागद म्हणजे सरकारचा मराठा जीआर!
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी आंदोलनाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी येथे केला आहे. पवार कुटुंबाने महाराष्ट्रातीलओबीसी आरक्षण संपविल्याचा थेट हल्लाबोल करत त्यांनी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात असल्याचा दावा केला.
बारामतीत ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. मोर्चात वासुदेव आणि पोतराजाच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. सभेत बोलताना प्रा. हाके यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले. ग्रामपंचायतीच्या पॅनल प्रमुखापासून ते मंत्रिपदापर्यंत हेच लोक आहेत. कोणाचीही सत्ता येवो, अर्थमंत्री अजित पवारच असतात. राज्यात गावोगाव ५० टक्क्यांपेक्षा अधिक ओबीसी समाज असूनही, ओबीसी संबंधित योजनांसाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने राज्य करणारे पवार कुटुंबीय अवघा १ टक्का निधीची तरतूद करतात, असा आरोप हाके यांनी केला.
अंतरवालीतील ओबीसींचे उपोषण अखेर स्थगित
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गत पाच दिवसांपासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू होते. ओबीसी उपसमितीचे सदस्य तथा मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर पाचव्या दिवशी शुक्रवारी आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित केले आहे. मंत्री सावे यांनी त्यांना मुंबईत बैठकीला बोलावले आहे.
शरद पवारांनीच जरांगेंना उभे केले
१) सारथी संस्थेच्या भव्य कार्यालयाची तुलना शेअर मार्केटशी करत ओबीसींसाठी मात्र केवळ १००० चौरस फूट कार्यालय देण्यात आल्याचे सांगत हाके म्हणाले, की मराठा नेते मनोज जरांगे यांना शरद पवार यांनीच उभे केले. गावातील राजकारणावरील पकड मजबूत होण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले आहे.
२)‘शरद पवार यांनी मंडल आयोग लागू केला हा गैरसमज आहे. मंडल आयोग हा संपूर्ण देशात लागू झाला, केवळ राज्यात नव्हे. या आयोगाची चळवळ शेकापचे दि. बा. पाटील, बबनरावजी ढाकणे, शिवाजीभाऊ शेंडगे, छगन भुजबळ, अरुण कांबळे आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी लढवली.
३) ‘ज्येष्ठ नेते शरद पवार हे ४०० संस्थांचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहील, असा नियम होता. मात्र, त्यात खाडाखोड करून शरद पवार अध्यक्ष झाले. व्हीएसआयचेही ते अध्यक्ष झाले,’ अशी टीका हाके यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांचा हाकेंना फोन
प्रा. हाके यांचे भाषण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा फोन आला. आंबेडकर म्हणाले, ‘ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच राहिले पाहिजे. हे भांडण लावणारे शासन आहे. जबरदस्तीने दिलेले आरक्षण आहे. त्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल. रस्त्यावर उतरावे लागेल.’
...तर परिस्थिती बिघडेल : वडेट्टीवार
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत आमचा कोणाचाही विरोध नाही; परंतु कुणबी दाखले मिळून जर ते ओबीसीमध्ये येणार असतील, तर परिस्थिती बिघडणार आहे, असा इशारा काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे दिला. ओबीसी समाजाला मुळातच आरक्षण २७ टक्के आहे. त्यात १३ टक्के भटके विमुक्त व इतर साठी राखीव आहे. उरलेल्या १९ टक्क्यांत जर ते आले, तर कोणालाच योग्य न्याय मिळणार नाही.