इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 11:52 IST2020-01-17T11:50:48+5:302020-01-17T11:52:28+5:30
सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते.

इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरेही घ्यायचे
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राऊत यांनी आपले विधान मागे घेतले आहे. मात्र करीम लालाची भेट केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनीही घेतल्याचा दावा करीम लालाचे नातू सलीम खान यांनी केला आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याने गदारोळ झाल्यानंतर सलीम खान यांनी हा दावा केला आहे. राऊत म्हणाले होते की, करीम लाला याची भेट अनेक नेते घेत होते. इंदिरा गांधी यांनी देखील करीम लालाची भेट घेतली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, शरद पवार, बाळ ठाकरे या दिग्गज नेत्यांशी करीम लाला यांची भेट होत असे.
दरम्यान करीम लाला यांना भेटालयला इंदिरा गांधी मुंबईत आल्या होत्या हे म्हणणे चुकीचे आहे. मात्र त्यांची भेट दिल्लीत झाली होती. याचे फोटो आजही उपलब्ध आहेत. करीम लाला पठानांचे नेते होते. पठाण समुदायाला अडचण आल्यास, करीम लाला नेहमीच नेत्यांना भेटून त्या अडचणी सोडवत होते.
सलीम खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले होते की, काँग्रेस निवडणुका जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेत होते. त्यावर सलीम म्हणाले की, करीम लाला हे एक व्यापारी होते. त्यांच्या मनात पठान समुदायासाठी आदर होता. राजकारणात जावं अस त्यांना कधीही वाटत नव्हतं. त्याच्याकडे एवढे पैसे नव्हते की, ते राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसे पुरवतील. संजय राऊत यांच्या वक्तव्याची तोडमोड करून ते सादर केल्याचा दावाही सलीम यांनी केला.