"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:33 IST2025-10-18T14:26:01+5:302025-10-18T14:33:03+5:30
Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal: बीडच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण उपसमितीचे ...

"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
Radhakrishna Vikhe Patil on Chhagan Bhujbal: बीडच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला अशा शब्दात छगन भुजबळ यांनी विखे पाटील यांना लक्ष्य केलं. विखे पाटील कारण नसताना मनोज जरांगेकडे जातात, असेही छगन भुजबळ म्हणाले. भुजबळ यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना भेटून समजवणार असल्याचे सांगितले.
"कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद का निर्माण होतोय मला कळत नाही. ओबीसी आरक्षण कमी होत असल्याचे काही पुरावे आहेत का? छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी काही गैरसमजुतीने ते वक्तव्य केलं असेल. पण इतकी वर्षे सार्वजनिक जीवनात काम करताना मला कधी मराठा विरुद्ध ओबीसी असा प्रश्न निर्माण झाल्याचे जाणवलं नाही. सगळे एकत्रच राहतात. उच्च न्यायालयामध्ये पाच पिटीशन दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे जनहित याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही. त्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालूच राहील. सर्व समाजाची माणसं एकत्र राहतात निवडणुका एकत्र लढतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र साजरे करतात. दिवाळी साजरी करताना कधी आपण म्हणतो का ओबीसीची दिवाळी आहे मराठ्यांची दिवाळी आहे. यामध्ये तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होत आहे हा प्रश्न नेहमी माझ्यासमोर आहे," असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यापासूनच स्पष्ट केले आहे की आमच्या डीएनएमध्येच ओबीसी आहेत. त्यामुळे त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच निर्माण झाला नाही. कायद्याचा चौकटीत बसवून मराठ्यवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे. छगन भुजबळ यांना भेटून त्यांना समजून सांगणार आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीने जे निष्कर्ष काढले आहे त्यावरून आपण कार्यवाही करत आहोत. न्यायमूर्ती शिंदे, छगन भुजबळ आणि मी एकत्र बसून हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करु," असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.