स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:51 IST2025-08-09T10:48:22+5:302025-08-09T10:51:28+5:30

आम्ही राजकीय दृष्ट्‍या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे असं राऊतांनी सांगितले.

No Maha Vikas Aghadi Alliance in local body elections; Sanjay Raut hints of 'MNS' Raj Thackeray or Uddhav Thackeray alliance | स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

मुंबई - महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी आणि इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेत अद्याप कुठलीही आघाडी नाही. मराठी माणूस आणि मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळे युतीबाबत हे दोन्ही बंधू निर्णय घेण्यास सक्षम आहेत असं मोठं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही. काही जण दिल्लीत पक्षप्रमुखांशी चर्चा करत असतील. परंतु ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेला आहे. ही महाराष्ट्राची मोठी घडामोड आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यावर चर्चा होत असते. दोन बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीत कुणालाही आक्षेप नाही. मराठीच्या प्रश्नावर हर्षवर्धन सपकाळ यांनीही भूमिका मांडली आहे. आम्ही राजकीय दृष्ट्‍या एकत्र आलो त्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि महाराष्ट्राचं रक्षण हाच आहे. शरद पवार असतील, राज्यातील काँग्रेसचे प्रमुख असतील या सर्वांची भूमिका मराठीबाबत समान आहे. आम्ही सगळे त्यासाठी एकत्र आलो होतो असं त्यांनी सांगितले.

तसेच आमची सगळ्यांशी चर्चा करतो, महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली. इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अद्याप कुठली आघाडी निर्माण झाली नाही. प्रत्येक महापालिका, जिल्हा परिषद क्षेत्रात स्थानिक आघाडी निर्माण होते हा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यात बऱ्याचदा राजकीय पक्षही नसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या त्या शहरातील, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबई हा विषय वेगळा असल्याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र भूमिका घेण्याचं ठरवले असेल तर देशातील, राज्यातील मराठी जनतेला त्याचा आनंदच होईल. राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधात कोणतीही भूमिका घेतली नाही. कधीकाळी शिवसेनेवरही हे आरोप होत होते. महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी बोलता आले पाहिजे. भाषेसंदर्भात आंदोलन सध्या पश्चिम बंगालमध्येही सुरू आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाषा आंदोलन सुरू केले आहे. तामिळनाडूतही हेच आंदोलन सुरू आहे. तुम्ही केवळ महाराष्ट्र आणि मराठी माणसांवरच आक्षेप का घेताय..मराठी बोलणार नाही असं सांगितले जाते तेव्हा त्यांच्याविषयी लोकांच्या रागाचा भडका उडतो हे स्वाभाविक आहे असं सांगत राऊतांनी मनसेच्या भूमिकेच्या समर्थन केले. 

फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवू नये

ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचं पाप केले. मराठी माणसांची संघटना फोडून नजराणा शाहांच्या पायाशी टाकला त्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये. आम्ही आमच्या अटीशर्तीवर दिल्लीत जातो. आम्ही कुणाची लाचारी करत नाही. लाचारी करत नाही म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला झिडकारून स्वतंत्र भूमिका घेतली. अमित शाहांनी अपमानित केले. आम्हाला लाचारी करायची असती तर तुमच्या मागे फरफटत फिरलो असतो. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सोबतच वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे असताना पोलिसांचा फौजफाटा घेऊन एकनाथ शिंदे दादागिरी करत असतील तर फार दादागिरी करू नका, तुमची दादागिरी फडणवीस मोडून काढतायेत. तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करू शकतो, मग तुम्ही कोण आहात, रस्त्यावरचा संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. जर संघर्षाची वेळ आली तर आम्ही कुठलाही संघर्ष करण्याची तयारी ठेवतो असा इशारा एकनाथ शिंदे गटाला दिला आहे. 
 

Web Title: No Maha Vikas Aghadi Alliance in local body elections; Sanjay Raut hints of 'MNS' Raj Thackeray or Uddhav Thackeray alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.