शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 07:43 AM2021-08-13T07:43:12+5:302021-08-13T07:43:41+5:30

सरकार एक सांगते, टास्क फोर्स वेगळेच

no coordination regarding reopening of schools bjp leader devendra fadnavis slams government | शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडणवीस यांची टीका

googlenewsNext

ठाणे/नवी मुंबई : शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार, टास्क फोर्स आणि मंत्र्यांमध्येच समन्वय नसल्याची टीका विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ठाण्यात केली. मंत्री वेगवेगळी घोषणा करतात, सरकार वेगळीच घोषणा करते आणि टास्क फोर्स काही तरी तिसरेच ठरवते. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून, त्यामुळे एक ठाम निर्णय सरकारने जाहीर करणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
संस्कार स्टडी क्लाऊड लोकार्पण सोहळ्यासाठी ते ठाण्यात आले होते. शाळा सुरू करण्यासंदर्भात त्यांनी सरकार, मंत्री आणि टास्क फोर्सच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. सर्वांनी एकत्रित बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आरक्षण प्रश्नावर सरकारचा वेळकाढूपणा
केंद्र सरकारने बुधवारी १२७ वी घटनादुरुस्ती करून, कुठल्याही समाजाला मागास ठरविण्याचा अधिकार राज्यांना दिला आहे. मराठा आरक्षण आम्ही दिले, ते उच्च न्यायालयात टिकलेही होते. महाविकास आघाडी केवळ राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार गंभीर नसून वेळकाढूपणा करत आहे. ओबीसींना आरक्षण द्यायचेच नाही, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. 

लोकशाहीचे राज्य नाही
संसदेचे अधिवेशन २५ दिवस चालू शकते. परंतु महाराष्ट्रातील अधिवेशन दोन दिवसांपेक्षा अधिक चालू शकत नाही. अधिवेशनात प्रश्न विचारायचे नाहीत, लक्षवेधी घ्यायच्या नाहीत, चर्चा करायची नाही. म्हणजे लोकशाहीच्या मार्गाने जे प्रश्न विचारले गेले पाहिजेत, त्यांची दारे बंद करण्यात आली असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

शिक्षणसम्राटांचे सरकार 
राज्यात शिक्षणसम्राटांचे सरकार असल्याने विद्यार्थ्यांची शुल्क माफी होईल असे वाटत नाही. परंतु शुल्क माफीचा उच्च न्यायालयाचा आदेश असून त्याचे पालन झाले नाही, तर त्यासंदर्भात राज्यात भाजपच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
 

Web Title: no coordination regarding reopening of schools bjp leader devendra fadnavis slams government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.