"नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 19:01 IST2025-03-18T18:59:11+5:302025-03-18T19:01:00+5:30

Congress Criticize Nitesh Rane: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून, सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

"Nitesh Rane is trying to disrupt law, order and social peace in the state", Congress criticizes | "नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका   

"नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम", काँग्रेसची टीका   

नवी दिल्ली - देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत असून, सामाजिक तेढ निर्माण करत आहेत. दुसऱ्याचे घर पेटवायला निघालेल्या लोकांनी हे लक्षात घ्यावे की तुमचे घर पेटले आहे. औरंगजेबाची कबर यांना का आठवत आहे? कारण सरकारचे अपयश लपण्यासाठी हे सगळे सुरू आहे. लाडकी बहीण, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या हे मुद्दे बाजूला करण्यासाठी हा घाट घातला जात आहे, अशी टीका  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मी जे बोललो नाही आणि जे बोललो त्याची सरमिसळ करून सांगितले जात आहे. माझ्या विधानावर मी ठाम आहे. देवेंद्र फडणवीस यांची व्यक्ती म्हणून मी औरंगजेबाशी तुलना केली नाही, त्यांच्या कारभाराची तुलना केलेली. औरंगजेबने फितुरी, फोडाफोडी केली म्हणून आम्ही त्याला क्रुर म्हणतो. फडणवीस यांच्या काळात हे सर्व करणा-या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. संतोष देशमुख यांची क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. स्वारगेट बलात्कार, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड, महिला अत्याचार वाढले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येने कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. औरंगजेबाने जसा जिझिया कर लावला होता तसाच कर आता सरकारने लावला आहे. शालेय वस्तूंवर कर, स्मशानातील लाकडावरही कर लावला आहे. मी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही, अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे ते वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? असे सपकाळ म्हणाले.

सपकाळ पुढे म्हणाले की, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारी गॅंग ही भाजप स्पॉन्सर आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होतो. एकनाथ शिंदे यांना औरंगजेब असा उल्लेख भावला म्हणून ते आज फुल फॉर्मात बोलले. त्यांच्या बोलण्याचा आशय धमकी स्वरूपाचा नसला तरी तसाच होता. अजित पवार यांनी देखील अशीच भूमिका मांडली आहे. माझ्याकडे ७० -७५ हजार कोटी नसल्याने, चुलत्याच्या खांद्यावर बसून मला राजकारण करता आले नसल्याने तसेच माझ्याकडे साखर कारखाना नसल्याने माझी उंची कमी आहे. मला दिलेलं काम वैचारिक पद्धतीने करायचं आहे.

नरेंद्र मोदी मागच्या जन्मी शिवाजी महाराज होते, असे भाजपाच्या एका खासदाराने म्हटले आहे. आता कोणीतरी भविष्यात म्हणेल की देवेंद्र फडणवीस मागच्याच्या मागच्या जन्मात शिवाजी महाराज होते. हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? पण अपमान करा आणि सुरक्षा मिळवा असा प्रकार राज्यात सुरू आहे. असे विधान करणाऱ्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाच्या कबरी बाबत जी भूमिका घेतली तशीच भूमिका इंग्रजांच्या हस्तक असणाऱ्या, पेंशन घेणाऱ्या, देशाला स्वातंत्र्य मिळू नये म्हणून काम करणाऱ्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणा-यांच्या बाबतीत घ्यावी. त्यांचे पुतळे स्मारके राज्यात आहेत, त्याबाबत त्यांनी भूमिका जाहीर करावी, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: "Nitesh Rane is trying to disrupt law, order and social peace in the state", Congress criticizes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.