Nishikant Dubey's Allegations On Thackeray Brothers: झारखंडमधील गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर टीका केली. X वरील एका पोस्टमध्ये दुबे यांनी शिवसेना (उबाठा) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तसेच, मुंबई आणि उपनगरांमध्ये कथितरित्या खरेदी केलेल्या मालमत्तांची यादी शेअर करताना, त्यांच्याकडे इतके पैसे कुठून येतात? असा प्रश्न उपस्थित केला.
मालमत्तांची यादी शेअर
निशिकांत दुबे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, "शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते यांच्या भ्रष्टाचाराची कहाण्या - न्यू मोर सांताक्रूझमध्ये 3 BHK फ्लॅट, वांद्र्यात 4BHK, रचना, रामेश्वर, समृद्धी, नालासोपारा येथे फ्लॅट, एअर इंडिया कॉलनीत फ्लॅट, काजुपाडा आणि बोरिवली येथे व्यावसायिक दुकाने, कोकण रेस्टॉरंट नालासोपारा, कोकण केळवे येथील निवासी मालमत्ता...इतके पैसे कुठून आणतात ?" अशी पोस्ट दुबे यांनी केली आहे.
राज ठाकरे गुंडांना पुढे करतात- दुबे
यानंतर निशिकांत दुबे यांनी २००७ च्या विकिलिक्सच्या अहवालाचा हवाला देत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "जेव्हा राज ठाकरेंना जनतेचा पाठिंबा मिळत नाही, तेव्हा ते गुंडांना पुढे करतात. याचा अर्थ गुंडगिरी हा त्यांचा खरा हेतू आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पराभवाची भीती असल्यामुळेच ते हे सर्व करतात. निवडणुकीच्या अगदी आधी ते हिंसाचार किंवा आक्रमक राजकारण करू लागतात. मी ठाकरेंच्या गुंडगिरीच्या विरोधात आहे आणि आता सहनशीलतेच्या सर्व मर्यादा संपल्या आहेत," अशी बोचरी टीका दुबे यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे.