दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी नवे नियम, एक मिनिटही उशीर झाल्यास पेपरला मुकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:52 PM2017-11-30T13:52:25+5:302017-11-30T15:52:31+5:30

कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत.

New rules for Class X-XII exams, if one minute delay, will lose paper | दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी नवे नियम, एक मिनिटही उशीर झाल्यास पेपरला मुकणार

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी नवे नियम, एक मिनिटही उशीर झाल्यास पेपरला मुकणार

Next

पुणे : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये पूर्ण वेळ बसावं लागणार आहे. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांसाठी नवे नियमही जाहीर केले आहेत. विद्यार्थ्याला परीक्षेला येण्यास एक मिनिटही उशीर झाल्यास खोलीत प्रवेश मिळणार नाही. तसंच परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गेल्यावर्षी गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, येत्या परीक्षेपासून राज्य शिक्षण मंडळाने ही पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचं स्वागत केलं आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. 

  1. : परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना खोलीत प्रवेश मिळणार नाही.
  2.  : परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून राहावं लागणार आहे
  3.  : विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल.

 

परीक्षा सुरु होण्यापूर्वी दहा मिनिटं आधी प्रश्नपत्रिकांचं वाटप करण्यात येतं, तोपर्यंत विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जातो. पण आता परीक्षेची वेळ सुरु झाली की विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्यातासापर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करुन ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत. 

  • परीक्षांचे वेळापत्रक - 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. दहावीची परीक्षा 1 मार्च 2018 ते 24 मार्च 2018 दरम्यान, तर बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2018 ते 20 मार्च 2018 दरम्यान होणार आहे. राज्य मंडळांतर्गत फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये राज्यातील नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी-बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार असून, त्याचे संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर18 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावर 15  दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. संभाव्य वेळापत्रकाबाबत लोकप्रतिनिधी, संघटना, पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याकडून प्राप्त झालेल्या तक्रारी, सूचना, अभिप्राय यांचे अवलोकन करून बारावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. मात्र, दहावीच्या वेळापत्रकात 5 मार्च रोजीचा द्वितीय सत्रातील नवीन व्यवसाय विषयाचा पेपर 17 मार्च रोजी प्रथम सत्रात घेतला जाईल.

  • छापील वेळापत्रकच अंतिम - 

www.mahahsscboard.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येणारे छापील वेळापत्रक हे अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य यंत्रणेने छपाई केले तसेच व्हॉट्सअ‍ॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. त्याच प्रमाणे प्रत्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व कनिष्ठ महाविद्याल्यांना कळविण्यात येईल, असे राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. 

Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com

Web Title: New rules for Class X-XII exams, if one minute delay, will lose paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.