“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 15:34 IST2025-07-12T15:32:06+5:302025-07-12T15:34:27+5:30

NCP SP Group Shashikant Shinde News: शरद पवार माझे दैवत आहेत. आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

ncp sp group shashikant shinde first reaction said we will point fingers at the failure of the mahayuti and enhance the party prestige | “महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

NCP SP Group Shashikant Shinde News: सध्याच्या महायुतीच्या कारभारावर जनतेत नाराजी आहे. सक्षम विरोधी पक्षनेता आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून उभे करण्याचा प्रयत्न करणे आव्हान असेल. लोकांमध्ये अंडरकरंट आहे त्याला प्रज्वलित करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या प्रक्रियेत सध्या लोकांच्या प्रश्नांऐवजी निवडणुका कशा जिंकायच्या याचा नवा पायंडा आलेला आहे. लोकांची क्रांती, लोकांचा उद्रेक आणि विरोध, उठाव होतो तेव्हा इतिहास घडत असतो. सरकारच्या आणि महायुतीच्या अपयशाकडे आणि चुकीच्या निर्णयांवर बोट ठेवून लोकांना प्रेरित करणे आव्हान असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काम करून लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. 

आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती असून, नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती निश्चित मानली जात असून, याबाबत शशिकांत शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे. 

शरद पवारांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी १०० टक्के काम करणार

प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील  आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. १५ तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावे चर्चेत आहेत, माझेही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणाने काम करू. संघटनेच्या माध्यमातून शरद पवार यांनी या महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे. पक्ष संघटना बांधली आहे. पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीत संघर्षाचा काळ आहे. लोकांना अपेक्षित अशा प्रकारचे नेतृत्व शरद पवार यांनी उभे केले. जयंत पाटील यांच्यासारख्या पक्षाध्यक्षांनी ज्या पद्धतीने काम केले, त्याची तुलना होऊ शकत नाही. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षाचा अजून निर्णय झालेला नाही. पक्षाची बैठक आहे एवढाच निरोप आला आहे. निर्णय काय होईल तो होईल, पक्ष बांधण्याच्यासाठी संघर्षात आम्ही एकजुटीने उभे राहू. शरद पवार यांच्या पक्षाची प्रतिष्ठा वाढवण्याचा १०० टक्के प्रयत्न करू, असे शशिकांत शिंदे म्हणाले.

आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करेन

बेरोजगारीचा प्रश्न आहे. विविध आश्वासने महायुतीने दिलेली आहेत. निवडणुका आल्या की, आश्वासनांची खैरात होईल हे लोकांना पटवून द्यायचे आहे. इनकमिंग आऊटगोइंग होत असते. नवीन लोकांना संधी देणे, त्यांच्याकडन नेतृत्व उभे करणे हा शरद पवार यांचा गुण आहे. कोण जाते, लगेच यश मिळाले पाहिजे, यापेक्षा राजकीय, सामाजिक चळवळीत लोक इच्छुक आहेत, त्यांना पुढे आणले तर महाराष्ट्रात बदल घडवण्याची क्षमता आहे. मला जर संधी मिळाली तर ते भाग्य समजेन. शरद पवार माझे दैवत आहेत. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर आर. आर. पाटील यांच्यासारखे काम करण्याचा प्रयत्न करेन. शेतकरी, युवक वर्गाचे प्रश्न आहेत. या मुद्यांवर काम करावे लागेल, असे शशिकांत शिंदे यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागील वर्षी झालेल्या वर्धापन दिनापासूनच प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू होत्या. प्रदेशाध्यक्षपदाबाबत पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचे बोलले जात होते. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत संकेत दिले होते. जयंत  पाटील बोलताना म्हणाले होते की, मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे.  जयंत पाटील काही दिवसातच पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

 

Web Title: ncp sp group shashikant shinde first reaction said we will point fingers at the failure of the mahayuti and enhance the party prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.