“अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?”: रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:54 IST2026-02-02T11:50:55+5:302026-02-02T11:54:38+5:30
NCP SP Group MLA Rohit Pawar News: माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसे आज पोरकी झालीत.

“अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?”: रोहित पवार
NCP SP Group MLA Rohit Pawar News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यातच अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रोहित पवार हळवे झाले असून, काकांचे स्मरण त्यांना पावलोपावली होताना दिसत आहे. पुन्हा एकदा रोहित पवार यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत आठवणींना उजाळा दिला.
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागे राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचे किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोक भेटतायत आणि अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोक फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असे नाही तर सामान्य माणसे आहेत, पण अजितदादांमुळे त्यांच्या जीवनात कसे परिवर्तन झाले, अजितदादांनी त्यांचे कोणते काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणे कठीण होते. हे अनुभवत असताना अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झाले, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसते, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण-कशी भरून काढणार?
रोहित पवार पुढे लिहितात की, म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचे मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होते, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसे आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार?, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना शरद पवार यांनी सांगितले की, चार महिन्यांपासून विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू होती. विलीनीकरणाची घोषणा १२ तारखेला होणार होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील करत होते. मात्र, अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे या प्रक्रियेला खंड पडला. या चर्चामध्ये मी प्रत्यक्ष सहभागी नव्हतो. अजितदादा, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे सातत्याने यात होते. दोन्ही पक्षांमध्ये एकत्र काम करण्याबाबत एकमत होते. दादांची इच्छा होती की, पक्ष एकत्र यावेत. ती इच्छा पूर्ण व्हावी, ही आमचीही इच्छा आहे, असे शरद पवार यांनी नमूद केले.
राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त… pic.twitter.com/pI1DRjK1Ge
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 2, 2026