NCP Nawab Malik Slams Narendra Modi Over modi photo on vaccination certificate | "...तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील", नवाब मलिकांचा सणसणीत टोला

"...तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील", नवाब मलिकांचा सणसणीत टोला

मुंबई - कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा (PM Narendra Modi) फोटो लावण्यात आला आहे. विरोधकांकडून या गोष्टीवर आक्षेप नोंदवला आला आहे. याची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला निर्देश देत पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असं सांगितले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. फोटोवरून मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. 

"मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील" असं म्हणत नवाब मलिक यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या स्पर्धेत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मोदींचेच फोटो आहेत. जिकडे पहावं तिकडे मोदींचेच फोटो दिसतात. खादीच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींच्या फोटोच्या जागी स्वतःचा फोटो छापला. आता लसीकरण प्रमाणपत्रावरही मोदींनी स्वतःचा फोटो लावला आहे. हे असंच चालत राहिलं तर मोदीजी नोटेवरून गांधींचा फोटो हटवून स्वतःचा फोटो छापतील" असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

"भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करतंय"

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे स्टेडियम उभारण्यात आले आहे. या मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. यावरून देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. त्यावरून टीकास्त्र सोडलं होतं. 

मोदी सरकार कोणतीही नावं बदलत आहेत. भारतरत्नांचा अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला होता. "नरेंद्र मोदींच्या नावाने ज्या स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे त्याचं नाव आधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने होतं. भारतरत्नाच्या नावाचा असा बदल करणं हे कुठेतरी सर्व भारतरत्नांचा अपमान केल्यासारखं आहे. हे अपमान करण्याचं काम भाजपा आणि मोदी सरकार करत आहे. देशातील जनता हा निर्णय सहन करणार नाही" असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, कोरोना लस घेणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, तेथील कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार आचार संहितेचे उल्लंघन करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. मात्र, तो आरोप निवडणूक आयोगाकडून फेटाळण्यात आला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCP Nawab Malik Slams Narendra Modi Over modi photo on vaccination certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.