अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 19:48 IST2025-04-17T19:43:47+5:302025-04-17T19:48:30+5:30
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: गेल्या काही दिवसांपासून बैठकांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार एकाच ठिकाणी आल्याचे पाहायला मिळाले. तसेच आजही शरद पवार हे आमच्यासाठी दैवत आहेत आणि उद्याही कायम राहतील, असे विधान अजित पवारांनी एका सभेत बोलताना केले होते. यावरून अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यातच यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यानंतर सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनील तटकरे यांना रायगड पालकमंत्रीपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, कुठलीही अपेक्षा मनामध्ये न ठेवता, निरपेक्ष बुद्धीने परमेश्वराच्या चरणी लीन झालो की, त्यातून एक सात्विक समाधान मिळत असते. माझ्या मनात कोणताही विषय नाही. अवघ्या महाराष्ट्राला, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, हीच प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी केली, असे तटकरे यांनी सांगितले.
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का?
अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का, अशा आशयाचा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, पांडुरंगाकडे अशा प्रकारची मागणी करण्याचे काही कारण नाही. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असे आम्ही सर्वांनी मिळून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही आता पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली उद्याच्या भविष्यासाठी राजकीयदृष्ट्या काम करणार आहोत. यात आम्हाला यश मिळत राहो, असे सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, कुटुंबासमवेत श्री क्षेत्र तुळजापूर, अक्कलकोट आणि पंढरपूर या तीन पवित्र तीर्थस्थळांचे दर्शन घेतले. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, अक्कलकोट निवासी श्री स्वामींच्या कृपेने आणि विठ्ठल-रखुमाईंच्या चरणस्पर्शाने मन प्रसन्न झाले. एका दिवसात या तीन पवित्र तीर्थस्थळांची एक अविस्मरणीय यात्रा झाली. या यात्रेतून आध्यात्मिक शांती आणि कुटुंबियांसोबत अमूल्य क्षण मिळाले, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.