“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 20:36 IST2025-09-26T20:31:49+5:302025-09-26T20:36:20+5:30
Hasan Mushrif News: सुप्रिया सुळे, संजय राऊत किंवा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच सरकारला पेचात पकडणे आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
Hasan Mushrif News: महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मिळून पूरग्रस्तांच्या अपेक्षा पूर्ण करतील. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील. संजय राऊत यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. संजय राऊत यांनी त्यांच्या खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तरी मी त्यांचे आभार मानले असते, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी केली. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
सुप्रिया सुळे, संजय राऊत किंवा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षात आहेत. त्यांचे कामच सरकारला पेचात पकडणे आहे. पण शेतकऱ्यांना शांत करणे, शेतकऱ्यांना मदत करणे हे सरकारचे काम आहे आणि ते आम्ही करत आहोत, असे मुश्रीफ म्हणाले.
गेल्या चार दिवसात अंबाबाईच्या दर्शनाला लाखो भक्त आले आहेत. मी आज दर्शन घेऊन अंबाबाईला प्रार्थना केली की, मराठवाड्यावर आलेले महापुराचे संकट दूर कर. पूरग्रस्त नागरिकांचे झालेले नुकसान भरून देण्याची ताकद अंबाबाईने सरकारला द्यावी, अशी प्रार्थना केली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार-खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री, आमदार तसेच भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. तसेच बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला.