"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 14:40 IST2025-10-09T14:37:34+5:302025-10-09T14:40:40+5:30
नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे. त्यामुळे काल विमानतळाचं उद्घाटन झाले ते दि.बा.पाटील यांचं नाव न घेता झाले असा दावा संजय राऊत यांनी केला.

"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
मुंबई - उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील नाव द्यावे असा कॅबिनेट प्रस्ताव करून केंद्र सरकारला पाठवला होता. दि. बा. पाटील हे नाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विमानतळाला नाव काय दिलंय? दि.बा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीत विरोध आहे. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील नाव ठेवण्याची गरज काय असा प्रश्न भाजपात उपस्थित केला जात आहे असं सांगत उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला.
संजय राऊत म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यास गौतम अदानींनीही विरोध केला. या विमानतळाला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्यावे अशी भाजपात चर्चा आणि मागणी सुरू झाली आहे. आता मोदींचं नाव कसं देणार हा प्रश्न काहींना पडेल. परंतु गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम जे वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सुरू होणार होते. त्याचे नामांतर जिवंतपणीच नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाले. त्याचप्रमाणे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी यांचं नाव द्यावे यावर भाजपात एकमत झालं आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे. त्यामुळे काल विमानतळाचं उद्घाटन झाले ते दि.बा.पाटील यांचं नाव न घेता झाले. दि.बा पाटील यांच्या नावाला गौतम अदानी यांचा ठाम विरोध आहे. हीच भूमिका भाजपाची आहे. मी १०० टक्के दाव्याने ही माहिती देतोय. नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने हे विमानतळ ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अदानी आणि भाजपाच्या प्रमुख लोकांच्या याबाबत बैठका झाल्या आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपाच्या निमंत्रण पत्रिका खासगी आहेत. त्या स्थानिक भाजपाच्या होत्या. परंतु मी जे बोलतोय ती राष्ट्रीय पातळीवरील चर्चा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जावे असं भाजपातील नेत्यांची इच्छा आहे. भूमिपुत्र दि. बा.पाटील यांच्या नावाने हे विमानतळ मंजूर झाले आहे. त्यांच्या नावानेच हे विमानतळ ओळखले जावे. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला मिळावा ही आमची भूमिका आहे. दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. त्यावर पंतप्रधान सकारात्मक आहे असं भाजपा म्हणतंय, परंतु गुजरातमधील स्टेडियमलाही माझे नाव देऊ नका असं मोदी म्हणत होते. परंतु नरेंद्र मोदी यांचं नाव दिले त्यानंतर ते उद्घाटनाला आले होते. त्यामुळे त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नका असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.