नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:06 IST2025-05-22T07:06:13+5:302025-05-22T07:06:40+5:30
ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला.

नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात आश्रय घेऊन देशातील प्रमुख नक्षलवादी कारवायांना कृतीत उतरविणारा आणि चार राज्यांच्या पोलिस यंत्रणेसह राष्ट्रीय तपास यंत्रणेला आव्हान देणाऱ्या नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू (७०) याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तब्बल ४५ वर्ष त्याने नक्षलवादी चळवळीला दिले. यादरम्यान त्याला केवळ एकदाच अटक झाली हाेती. ज्या अबुझमाडमधून तो नक्षलवादी चळवळीचे नेतृत्व करीत होता, तेथेच त्याच्या कारकिर्दीचाही अखेर झाला.
अबुझमाडमध्ये मंगळवारी ५०० हून अधिक डीआरजी आणि सुरक्षा जवानांनी नक्षलविराेधी माेहीम राबविली. यावेळी उडालेल्या चकमकीनंतर जंगलात २७ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यात बसवा राजूचाही समावेश होता. त्याच्यावर विविध राज्यांंमध्ये पाच काेटींचे बक्षीस हाेते, शिवाय एनआयएने दहा लाखांचे बक्षीस त्याच्यावर ठेवले हाेते. बसवा राजूसोबत आणखी काही माेठे कॅडर ठार झाल्याची माहिती असून ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
एकदाच झाली होती अटक
१९८० मध्ये श्रीकाकुलम येथे रॅडिकल स्टुडंट्स युनियन (आरएसयू) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष झाला. तेव्हा बसवा राजू यास फक्त एकदाच अटक करण्यात आली होती.
जिलेटिनचे प्रशिक्षण
आंध्र प्रदेशात जेव्हा सीपीआय (एमएल) पीपल्स वॉरची स्थापना झाली तेव्हा बसवा राजू प्रमुख संघटकांपैकी एक होता. त्याने जहाल नक्षली नेता मल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी, मल्लोजुला वेणुगोपाल आणि मल्ल राजी रेड्डी यांच्यासोबत बस्तरच्या जंगलात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) च्या माजी सैनिकांकडून १९८७ मध्ये जिलेटिन हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याच्याकड लष्करी रणनीती आणि स्फोटकांचा वापराचे विशेष कौशल्य होते.
बी. टेकनंतर मिळविले लष्करी रणनीतींवर प्रभुत्व
बसवा राजू आंध्र प्रदेशातील जियान्नापेट (जि.श्रीकाकुलम) गावचा. त्याने वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेक उत्तीर्ण केले.
महाविद्यालयीन जीवनापासूनच तो डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्याने लष्करी रणनीतींवर प्रभुत्व मिळवले होते.
दुसरा सरचिटणीस
नक्षलवादी संघटनेचा बसवा राजू हा दुसरा सरचिटणीस आहे. १० नाेव्हेंबर २०१८ राेजी मुपल्ला लक्ष्मणराव उर्फ गणपती याच्या राजीनाम्यानंतर ताे सर्वाेच्च नेता बनला.
वेशभूषा बदलून करायचा हल्ले : पोलिसांनुसार, नंबाला केशव राव हा कृष्णा, विनय, गंगान्ना, प्रकाश, विजय, केशव, बीआर, उमेश, राजू, दरपू, नरसिंम्मा, अशा १५ नावांनी चळवळीत ओळखला जायचा. भूमिगत राहून सूत्रे फिरविण्यात ताे माहीर हाेता.