"…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नागपूर दंगल प्रकरणी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’, काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:53 IST2025-03-18T15:53:05+5:302025-03-18T15:53:48+5:30
Nagpur Violence News: नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत पोलीस इंटेलिजन्स यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलिसांवर हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

"…तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नागपूर दंगल प्रकरणी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’, काँग्रेसची टीका
मुंबई - नागपूरमध्ये काल रात्री उसळलेल्या दंगलीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. हिंसक जमावाने रस्त्यावरील वाहनांसह घरं आणि दुकानानांही लक्ष्य केलं होतं. आता या दंगलीचे तीव्र राजकीय पडसाद उमटत असून, विरोधी पक्षातील काँग्रेसनेनागपूरमध्ये झालेल्या दंगलीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीत पोलीस इंटेलिजन्स यंत्रणा अपयशी ठरली आहे. पोलिसांवर हल्ले होत असतील तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
नागपूर दंगलीवर बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, नागपूर शहर हे शांतताप्रिय शहर आहे. हिंदू मुस्लीम दोघेही आजपर्यंत शांततेने रहात आहेत. राम नवमीला दोन्ही समाजाचे लोक उत्साहाने सहभागी होतात. तर ताजुद्दीनबाबाच्या उरुसामध्येही हिंदू मुस्लीम एकोप्याने सहभागी होतात, अशा शहरात धार्मिक दंगल होतेच कशी, सरकारला याची काहीच कल्पना नव्हती का, हे सरकारचे अपयश आहे. पोलिस इंटेलिजन्स काय करत होते आणि पोलिसांवरच हल्ले होत असतील तर गृहमंत्री पदावर फडणीस रहातात कसे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
मध्य नागपूरमध्ये ही घटना झाली असून, याच भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे घर आहे. स्थानिक भाजपा आमदार प्रविण दटके पोलिसांना दोष देत असतील तर त्याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे पण दंगलीचा फायदा कोणाला होतो हे सर्वांना माहित आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला अत्याचारांच्या घटना सातत्याने होत आहेत, शेतमालाला भाव नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी व महागाई वाढली आहे या मुळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा प्रयत्न आहे असेही लोंढे म्हणाले. नागपुरकारांनी अफवांना बळी न पडता शांतता राखावी असे आवाहनही अतुल लोंढे यांनी केले आहे.