Nagpur Monsoon Session: ऑरेंज सिटीत आले संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 12:01 IST2018-07-04T11:52:11+5:302018-07-04T12:01:06+5:30
संभाजी भिडेंच्या अजब विधानाची खिल्ली

Nagpur Monsoon Session: ऑरेंज सिटीत आले संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे
नागपूर: विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. संभाजी भिडेंच्या अटकेच्या मुद्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. हा मुद्दा उचलून धरण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी अनोख्या मार्गाचा वापर केला आहे. ते संभाजी भिडे यांच्या वेशभूषेत विधीमंडळ परिसरात दाखल झाले. यावेळी त्यांच्या हातात आंब्याची टोपलीदेखील होती.
माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं अजब विधान संभाजी भिडेंनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका कार्यक्रमात केलं होतं. त्या विधानाचा त्यावेळी अनेकांनी समाचार घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश गजभिये विधीमंडळ अधिवेशनात टोपलीतून आंबे घेऊन आले. गजभिये यांच्या हातातील आंब्याची टोपली अनेकांचं लक्ष वेधून घेत होती. गजभिये यांनी या आंब्यांवर 'संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे' असं लिहिलं होतं. हे वाचून अनेकांना हसू आवरता आलं नाही.
पावसाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या अटकेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. भिडे यांच्या वेशभूषेत आलेल्या आमदार गजभिये यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. 'संभाजी भिडे यांच्याविरोधात सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांना आतापर्यंत अटक व्हायला हवी होती. मात्र अद्याप त्यांना अटक झालेली नाही. मनुस्मृती ही पहिली राज्यघटना होती, असं संभाजी भिडे म्हणतात. आम्हाला मिळालेले अधिकार हे मनूनं दिले आहेत की संविधानानं दिले आहेत, हे सरकारला विचारण्यासाठी मी या वेशभूषेत आलो आहे,' असं प्रकाश गजभिये यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.