'मी पण एका मुलीचा बाप आहे हो!'; योगेश कदमांनी सुनावले, 'त्या' विधानावर मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:40 IST2025-02-28T17:29:20+5:302025-02-28T17:40:59+5:30
yogesh kadam statement: पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात झालेल्या अत्याचार प्रकरणाबद्दल माहिती देताना योगेश कदम यांनी विधान केले. त्यामुळे वाद निर्माण झाला. आता त्यावर खुलासा केला आहे.

'मी पण एका मुलीचा बाप आहे हो!'; योगेश कदमांनी सुनावले, 'त्या' विधानावर मांडली भूमिका
Yogesh Kadam swargate news marathi: 'स्वारगेट बसस्थानकावर जी घटना घडली. ती अतिशय शांतपणे घडली. कुठलीही बळजबरी किंवा वादविवाद झाला नाही.' या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानाने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले. त्यावरून टीकेची झोड उठली. अखेर योगेश कदम यांनी या विधानाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करत विरोधकांना सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना योगेश कदम म्हणाले, "भारतात नवीन कायदा आहे. बीएनएसमध्ये ज्या तरतुदी आहेत, त्यातील जास्तीत जास्त कलमे लावून आरोपीला कडक शिक्षा दिली जाईल, हे मी कालच सांगितलं आहे. त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
मी पण एका मुलीचा बाप, योगेश कदमांचं विरोधकांना उत्तर
"ज्या विधानामुळे वाद निर्माण झाला, त्याबद्दल बोलताना योगेश कदम म्हणाले, "एक गोष्ट लक्षात घ्या की, मी पण एका मुलीचा बाप आहे हो!. त्यामुळे महिलांच्या बाबतीतील संवेदना बाळासाहेबांच्या शिकवणीपासूनच आमच्यामध्ये आहेत. त्यामुळे मला वाटतं की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. त्याचा राजकारणासाठी वापर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून चालला आहे. त्याचा मी निषेध करतो", असे योगेश कदम म्हणाले.
"ज्यावेळी मी तिथे गेलो, त्यावेळी स्वारगेट हे कुठल्या कोपऱ्यात नाही. रहदारीचं ठिकाण आहे. अशा रहदारीच्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणी तिला वाचवायला का गेलं नाही, हा प्रश्न मी पोलिसांना विचारला. तिथे पोलिसांनी मला जे सांगितलं, तेच मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. त्यामुळे मला वाटतं की, त्या वक्तव्याचा असा राजकारणासाठी वापर होत असेल, तर ते चुकीचं आहे", असे उत्तर योगेश कदम यांनी दिले.
ज्यामुळे विरोधक टीका करताहेत ते विधान काय?
स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणी अत्याचार झाले. त्याठिकाणी पाहणी केल्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरूवारी (२७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना एक विधान केले. ज्यामुळे वाद निर्माण झाला.
ते म्हणाले होते की, "विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो; दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती सगळ्यांना आहे. अशा वेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही वादविवाद, कुठलीही बळजबरी, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे. हाणामारी झाली आहे, असे काहीच घडलेले नाही. त्यामुळे आसपास असलेल्या सर्वसामान्यांदेखील ते कळले नाही", असे विधान कदम यांनी केले होते.