“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:31 IST2026-02-18T17:27:47+5:302026-02-18T17:31:24+5:30
Rohit Pawar News: सोशल मीडियावरून होणाऱ्या ट्रोलिंगला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे”; कुणाला दिला इशारा?
Rohit Pawar News: अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा राजकीय वर्तुळात वेगाने चर्चेत आला. अपघातापूर्वी अजित पवार आणि शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांच्यात बऱ्याच बैठका झाल्या होत्या. याच बैठकातून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घोषणा होणार होती. १२ फेब्रुवारी ही तारीखही ठरण्यात आली होती असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते करत होते. यातच अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत पुतणे रोहित पवार सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. यातच रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत थेट इशारा दिला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अजित पवार यांच्या विमान अपघातामागे कशाप्रकारे घातपात असू शकतो, याची थिअरी मांडण्याचा प्रयत्न रोहित पवार करताना पाहायला मिळत आहे. रोहित पवार यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येण्यावरून भाजपाचे नाव घेत टीका केली आहे. तसेच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासाठी मीडिया मॅनेजमेंटचे काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरा यांच्यावरही निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.
माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते, मी रोहित पवार आहे
भाजप आणि इतर काही ट्रोलर्स, मी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत जे काही बोलत आहे, त्यावरुन मला वेड लागल्याचा प्रचार करणारे ट्रोल करत आहेत. होय मला अजितदादांवरील प्रेमापोटी वेड लागलंय. पण भाजप आणि इतर ट्रोलर्सना पैसे घेऊन काम करण्याचं वेड लागलंय. मला माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलं आहे. मला एकट्यालाच नाही तर महाराष्ट्रातील जनतेला हे वेड लागले आहे. आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणूस आहे. या सगळ्या लोकांना मला एक सांगायचं आहे की, तुम्ही मला पाण्यात बघत आहात. पण माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. या महाराष्ट्रातील स्वाभिमानी मराठी नागरिक माझ्यासोबत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मला विलीनीकरणावर बोलायचे नव्हते. पण जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि अजितदादांची इच्छा दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची होती. भावनिक दृष्टीने ते विचार करत होते. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते तर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद डॉ. अमोल कोल्हे यांना देण्यात आले असते. दुसऱ्या गटातील लोकांना विलीनीकरणावर बोलायला भारी वाटते. त्यांच्या पत्रकार परिषद पाहिल्या तर त्यांना विलीनीकरणावर बोलायला फार आवडते. आम्हीच अजितदादांचा अपघात की घातपात या विषयावर बोलतोय. त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे आहे त्यावर मी बोलले पाहिजे असे वाटत नाही असे त्यांनी सांगितले.