"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:08 IST2025-11-20T13:07:59+5:302025-11-20T13:08:27+5:30
Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर अमित शाहांनी एकनाथ शिंदे यांना धीर देत मोठं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदेगट या घटक पक्षांनी एकमेकांचे नेते आणि कार्यकर्त्यांची फोडाफोड करण्याचा सपाटा लावल्याने महायुतीमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. भाजपाकडून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे नाराज असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली. ही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेली असता उलट फडणवीसांनीच शिंदे गटाने केलेल्या फोडाफोडीचा पाढा वाचत या नेत्यांचीच कोंडी केली होती. त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर अमित शाहांनीएकनाथ शिंदे यांना धीर देत मोठं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अमित शाहांची भेट घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या तक्रारी ऐकल्यावर अमित शाह यांनी महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष आहे. तुम्ही एनडीएतील प्रमुख नेते आहात. तुमचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल, असे सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदे गटाच्या नेत्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यापुढच्या काळात शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो पदाधिकारी असेल त्याला भाजपात घ्यायचे नाही आणि भाजपाचा पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही असे स्पष्ट आदेश आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही कार्यवाही आमच्या पक्षात सुरू झाली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आता यावर महाराष्ट्र भाजपाकडून काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.