मुंबई : सेक्सला दिला नकार म्हणून 'फेसबुक बॉयफ्रेंड'ने केली निर्घृण हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 17:10 IST2018-02-19T15:23:08+5:302018-02-19T17:10:08+5:30
मुंबईच्या नालासोपारामध्ये सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे वाशीच्या अंकिता मोरेची निर्घृण हत्या...

मुंबई : सेक्सला दिला नकार म्हणून 'फेसबुक बॉयफ्रेंड'ने केली निर्घृण हत्या
मुंबई : मुंबईच्या नालासोपारामध्ये एका तरूणीला घरी बोलवून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली आहे. सेक्स करण्यास नकार दिल्यामुळे बॉयफ्रेंडनेच तिची निर्घृण हत्या केली आहे. अंकिता मोरे असं या युवतीचं नाव आहे. हरिदास निरगुडे याच्याशी अंकिताची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती.
वाशीला राहणा-या 20 वर्षीय अंकिता मोरेची फेसबुकच्या माध्यमातून हरिदास निरगुडे नावाच्या 25 वर्षीय तरूणाशी मैत्री झाली होती. रविवारी पहिल्यांदाच अंकिता त्याला भेटायला नालासोपारा पूर्वेला त्याच्या घरी गेली होती. येथील अलकापुरी भागातील तानिया मोनार्क या चार मजली इमारतीत हरिदास निरगुडे तळमजल्यावर राहतो. येथे पोहोचल्यावर निरगुडेने अंकिताकडे शारिरिक संबंध ठेवण्याची मागण केली. त्याच्या मागणीला अंकिताने नकार दिला आणि तेथून जाण्याच्या प्रयत्नात ती होती. सेक्सला नकार मिळाल्यामुळे हरिदास निरगुडे चांगलाच संतापला होता. त्याने आपल्या बुटांच्या लेसच्या सहाय्याने अंकिताचा गळा आवळून निर्घृण हत्या केली.
इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने अंकिताचा मृतदेह सुमारे 7.15 वाजता तळमजल्याशेजारच्या जिन्यावर पाहिला, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता अशी माहिती आहे. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे.
पोलिसांना निरगुडेच्या फ्लॅटमध्ये बेडवर रक्ताचे डाग आढळले आहेत, तसंच अंकिताचा मोबाईल आणि पर्स निरगुडेच्याच फ्लॅटमध्ये सापडली आहे. आरोपीविरोधात कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अंकितासोबत बळजबरी केली होती अशी प्राथमिक माहिती चौकशीत समोर आली आहे.